Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनिमगावाला जलस्वराज योजनेचा वीजपुरवठा खंडित; पाण्यासाठी भटकंती

निमगावाला जलस्वराज योजनेचा वीजपुरवठा खंडित; पाण्यासाठी भटकंती

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

थकित वीजबिल ( Electricity Bill ) ग्रामपंचायतीने ( Nimgaon Grampanchayat ) न भरल्याने वीज वितरण कंपनीतर्फे जलस्वराज योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने गत सहा दिवसांपासून निमगाववासियांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा तत्काळ सुरू न करण्यात आल्यास महावितरण कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांसह धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि. प. अध्यक्ष मधुकर हिरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

जलस्वराज पाणीपुरवठा योजनेचे सुमारे आठ लाखांची थकबाकी असल्याने महावितरणतर्फे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली गेल्याने गत सहा दिवसांपासून निमगावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीच्या अडचणीकडे लक्ष न देता तसेच कुठलीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात येवून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे कृत्य वीज वितरणने केले असल्याचा आरोप हिरे यांनी पुढे बोलताना केला.

ग्रामपंचायतीमध्ये तीन महिन्यांपूर्वीच नवीन सदस्य निवडून आले आहेत. ग्रामसेवकाची बदली झाल्याने नवीन ग्रामसेवक नियुक्त झाले असून त्यांच्या सहीचा नमुना देण्यासाठी किमान दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामुळे वीजबील भरण्यात अडचण निर्माण झाली आहे. सदरची थकबाकी ही गेल्या सात-साडेसात वर्षांची आहे. नवीन पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ आत्ताशी सुरू झाला आहे.

पैसे भरण्यास ग्रामपंचायतीचा विरोध नाही. मात्र अडचणी लक्षात न घेता पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करणे व 12 हजार लोकसंख्या असलेल्या संपूर्ण गावास वेठीस धरणे हा प्रकार अमानुषतेचा कळस आहे. त्यामुळे महावितरणने जलस्वराजची त्वरित वीजजोडणी न केल्यास ग्रामस्थांसह कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचे हिरे यांनी शेवटी बोलताना सांगितले.

ग्रामस्थांसह धरणे आंदोलन छेडणार

पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा ग्रामपंचायतीच्या अडचणी लक्षात न घेता तसेच कुठलीही सुचना न देता तोडण्यात आल्याने 12 हजार लोकसंख्या असलेल्या निमगावावर भिषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनतेचे हाल होत आहे. महावितरणने त्वरीत वीजजोडणी न केल्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांसह कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा जि.प. माजी अध्यक्ष मधुकर हिरे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या