Saturday, April 27, 2024
Homeनगरप्रेमविवाह केलेल्या तरुणास जीवे ठार मारण्याच्या हेतूने आलेल्या 7 आरोपींना पोलिस कस्टडी

प्रेमविवाह केलेल्या तरुणास जीवे ठार मारण्याच्या हेतूने आलेल्या 7 आरोपींना पोलिस कस्टडी

नेवासा (तालुका वार्ताहर) –

1 मार्च 2021 रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणाला मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी शस्त्रांसह येवून मारहाण

- Advertisement -

करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल नेवासा शहरात दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलिसांनी यातील 7 आरोपींना सायंकाळी ताब्यात घेवून अटक केली.

याबाबत प्रशांत ऊर्फ बंटी राजेंद्र वाघ (वय 31) धंदा-शिक्षण रा. कडू गल्ली नेवासा खुर्द याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी ज्ञानेश्‍वर महाविद्यालयात एसवायबीएच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मी माझी आई व वडिलांसह नेवासा येथे राहत आहे. माझे वडील राजेंद्र वाघ हे नेवासा तहसील कार्यालयात नोकरीस असून त्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. मी 1 मार्च 2021 रोजी माझी प्रेयसी ऋतुजा माणिक खेडकर हिच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. तिच्या घरच्यांचा या लग्नास विरोध होता.

6 मार्च 2021 रोजी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान मी घरासमोरील गल्लीत रस्त्यावर असताना माझ्या पत्नीचे वडील माणिक कोंडीबा खेडकर हे त्यांच्या हातात बांबूची काठी, ऋषीकेश खेडकर याच्या हातात बांबूची काठी माणिक खेडकर यांच्या भावाच्या हातात तांबड्या रंगाचे बट असणारे पिस्टलसारखे दिसणारे हत्यार माझ्या दिशेने रोखले, प्रदीप गायकवाड व बळीराम अर्जुन मिरगे यांच्या हातात लोखंडी सळई, अमोल भिमराज कनोजे याच्या हातात रामपुरी चाकू, शाहीद सय्यद याचे हातात स्टीलसारखा दिसणारा अंदाजे तीन फूट लांबीचा रॉड व नारायण हरिभाऊ चव्हाण याचे हातात पिस्टलसारखे दिसणारे हत्यार, तात्यासाहेब जगदाळे याचे हातात लहान आकाराचे पिस्टलसारखे दिसणारे हत्यार घेवून समोरुन गोलाकार आकारात उभे राहिले.

माणिक कोंडीबा खेडकर हे मोठमोठ्याने ओरडत शिवीगाळ करत याला मारा, सोडू नका असे सर्वांना ओरडून सांगत होते. त्यावेळी माझे उजवे बाजूस मोटारसायकलच्या पुढे उभे असलेला सतिश निराळे भोसले याने त्याच्या अंगावरील कपड्यात लपवून ठेवलेला गोलाकार आकारातील काळ्या रंगाची मूठ असलेल्या पांढरे रंगाची लांब पाते असलेले गुप्ती सारखे हत्यार हे उजव्या हाताने काढून काही कळण्याच्या आत माझ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. परंतु मी सदरचा वार चुकवून जिवाच्या आकांताना घराच्या दरवाजातून आत ओरडत पळालो.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील 9 जणांवर भारतीय दंड विधान कलम 307, 504, 506, 34, हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या आरोपींना कोर्टात हजर केले असता 12 तारखेपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली त्याचा पुढील तपास नेवासा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्याकडे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या