Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशInternational Yoga Day 2021 : योगासने करताना घ्या 'या' गोष्टींची खबरदारी

International Yoga Day 2021 : योगासने करताना घ्या ‘या’ गोष्टींची खबरदारी

आज २१ जून, आंतरराष्ट्रीय योग दिवस. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो.

आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन केले जात आहे.

- Advertisement -

शरीर आणि मन दोहोंचे स्वास्थ्य राखण्यासाठी योगा निश्चितच उत्तम व्यायामप्रकार आहे. उत्तम योगसिद्धी प्राप्त करायची असेल तर, सातत्य, सामर्थ्य आणि संयम असणे आवश्यक असते. सुरूवातीच्या काळात योगा शिकताना घाई किंवा काही अन्य कारणांमुळे मोठ्या चुका होण्याची शक्यता असते. या चुकांचे परिणाम गंभीर सुद्धा असू शकतात. जाणून घेऊया योगा करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे.

योगासने करताना घ्या ‘या’ गोष्टींची खबरदारी

१. योगा करत असताना मध्येच अजिबात पाणी पिऊ नये. असं केल्यास, तुम्हाला अलर्जी, सर्दी, खोकला अथवा कफ अशा तऱ्हेच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

२. योगा हा नेहमी सकाळी रिकाम्या पोटी आणि पोट साफ झाल्यानंतरच करायला हवा. अन्यथा योगा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही.

३. योग करत असताना तुम्ही शरीरावर कमीत कमी आणि सैलसर कपडे घाला. त्यामुळे तुम्हाला स्वतःला हलकं वाटेल. शरीरामध्ये कोणताही जडपणा आणि ताण तुम्हाला त्यामुळे जाणवत राहणार नाही.

४. योगा नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागीच करावा. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या बाल्कनी अथवा बागेमध्ये योगा करू शकता आणि हिवाळ्यात तुम्ही अशी रूम शोधा जिथे मोकळी हवा आणि चांगला उजेड येत असेल. पावसाळ्यातही तुम्ही अशाच रूमचा वापर करा.

५. योगा करताना सर्वात पहिले सोप्या आसनाने सुरुवात करावी आणि मग कठीण आसन करावं हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधीही थकवा येणार नाही आणि शरीरालादेखील आराम मिळेल.

६. योगा हा नेहमी एखाद्या तज्ज्ञांंच्या देखरेखीखालीच करावा किंवा तुम्हाला याचा पहिला अनुभव असेल तर तुम्ही योगा करा. चुकीचं आसन करण्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी अथवा तुमच्या मसल्समध्ये दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.

७. योगा नेहमी अशा जागी करावा जिथली जमीन सपाट असते. बेड अथवा सोफ्यावर बसून योगा करणं हे कधीही योग्य नाही.

८. योगा केल्यामुळे शरीरामध्ये खूपच उष्णता निर्माण होते त्यामुळे योगा केल्यावर लगेच आंघोळ करू नये. त्यामुळे तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे योगा केल्यावर एक तासाने आंघोळ करावी हे नेहमी लक्षात ठेवा.

९. नियमित स्वरूपात तुम्ही कोणतंही आसन करत असल्यास, तुम्हाला शरीरामध्ये कोणताही ताण अथवा दबाव निर्माण झाल्याचं जाणवत असेल तर हे आसन करू नका. तसंच याबाबत तुमच्या ट्रेनरला नक्की सांगा.

१०. तुम्हाला अंगात ताप असेल अथवा कोणत्याही दुसऱ्या एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही त्या दिवशी योगा करू नये. तसंच मासिक पाळीदरम्यान तुम्हाला जास्त रक्तस्राव होत असल्यासही योगा करू नये.

११. योगासने करताना आपले मन, चित्त एकाग्र करून आपण करीत असलेल्या आसनांवर लक्ष केंद्रित असणे गरजेचे असते. त्यामुळे योगासने करताना इतरांशी गप्पा मारणे, फोन वर बोलणे, फोनवरील मेसेजेस पहाणे आवर्जून टाळायला हवे.

- Advertisment -

ताज्या बातम्या