International Women’s Day 2021 : जागितक महिला दिनाची कशी झाली सुरूवात, काय आहे इतिहास?

jalgaon-digital
5 Min Read

गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ८ मार्च हा दिवस जागितक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. इतिहासात वेगवेगळ्या महिलांनी केलेल्या कामगिरीची आणि महिला हक्क चळवळींची आठवण काढण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक महिला दिन हा महिलांना सशक्तिकरणासाठी, महिलांना सन्मान देण्यासाठी, पुरूष आणि महिलांमधील भेदभाव कमी करण्यासाठी आणि महिलांना त्यांचे सर्व हक्क देण्यासाठी साजरा केला जातो. खरंतर आज महिलांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे. त्यामुळे आता हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.

जागतिक महिला दिनाचा इतिहास काय?

१९०८ सालात १५ हजार कष्टकरी स्त्रिया न्यूयॉर्क शहरात एकत्रित आल्या आणि आपल्या मागण्यांसाठी त्यांनी अभूतपूर्व असा मोर्चा काढला होता. कामाचे तास निश्चित करा, योग्य वेतन द्या आणि मतदानाचा अधिकार द्या या मागण्यासाठी कष्टकरी स्त्रिया रस्त्यावर उतरल्या होत्या. सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकन पुढाकार घेत ८ मार्च या दिवशी पहिला राष्ट्रीय महिला दिवस घोषित केला होता.

१९१० सालात क्लारा झेत्किन या जर्मनी मधील डेमोक्राटिक पार्टीच्या सदस्य असणाऱ्या स्त्रीने जागतिक महिला दिनाचा विचार मांडला आणि एका परिषदेत १७ देशातील १०० पेक्षा अधिक स्त्रियांनी या विचारला सहमती दिली. १९११ सालात ऑस्ट्रिया डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. समान अधिकारासाठी सुरु झालेल्या संघर्षाच्या लढाईतून महिला दिनाची कल्पना पुढे आली आहे. फ्रेंच क्रांती दरम्यान युद्ध थांबवा या मागणीसाठी स्त्रियांनी आंदोलन सुरु केले होते. युद्धात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यात आली होती.

१९१७ सालात रशिया मधील स्त्रियांनी महिला दिनाच्या दिवशी कपडे आणि अन्न अधिकारासाठी संप पुकारला होता. झारशाहीच्या अस्ता नंतर स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे १९०७ सालापासून कष्टकरी स्त्रियांनी वेगवेगळ्या देशात केलेल्या संघर्षातून महिला दिन जागतिक स्तरावर साजरा होऊ लागला आहे. १९७५ साली युनोने विश्वातील विविध देशात कष्टकरी स्त्रियांनी केलेल्या संघर्षाची दाखल घेत ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला आणि तो आता सर्वत्र साजरा केला जातो. दरम्यान, भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन हा ८ मार्च १९४३ ला साजरा झाला.

जागतिक महिला दिन आणि जांभळा रंगाचे कनेक्शन काय?

जांभळ्या रंगाच्या कनेक्शन मागे इतिहास आहे. लिंग समानता म्हणजेच Gender Equality चे प्रतिक म्हणून या रंगाकडे पाहिले जाते. जांभळा रंग हा ‘महिला मुक्तता आंदोलन’ याचं देखील प्रतिक आहे. स्त्रियांनी इतिहासात दिलेल्या त्यांच्या अधिकार आणि हक्काच्या लढ्यांमध्ये हाच जांभळा रंग प्रतिकात्मकतेने वापरण्यात आला होता. इतकंच नव्हे तर, जांभळ्या रंगासह हिरवा आणि पांढरा रंग देखील स्त्रियांच्या समानतेचं प्रतीक दर्शवतो. हिरवा रंग ‘आशा’ देतो, पांढरा रंग ‘पावित्र्य’ जपतो. तसंच जांभळा रंग स्त्रियांनी मिळवलेलं यश किंवा भविष्यात त्या ज्या यशाला गवसणी घालू इच्छित आहेत त्याचं हे प्रतीक आहे. त्यामुळे यंदा तुम्हीही जांभळा रंग परिधान करून स्त्री-पुरुष समानतेविषयी जागरूकता निर्माण करू शकता.

भारतातील महिलांसाठी कायदे कोणते?

समान वेतन मिळण्याचा हक्क

समान वेतन कायद्यानुसार महिलांना पुरूषांच्या बरोबरीने समान पगार मिळण्याचा हक्क आहे. म्हणजे समान गुणवत्ता असलेल्या पुरूष आणि महिलेमध्ये वेतन ठरवताना भेदभाव करता येत नाही.

लैंगिक छळाविरूद्ध कायदा

लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कंपनीमध्ये याबाबत एक समिती असणं बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी महिला कर्मचारी त्यांच्या लैंगिक छळाबाबत असलेल्या तक्रारी करू शकतात. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये ही कंपनीची जबाबदारी आहे. असं न झाल्यास कंपनीला दंड भरावा लागू शकतो त्याचप्रमाणे कंपनीचे लायसन्सदेखील रद्द होऊ शकते.

वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क

पुरूष आणि महिलांना कायद्याने समान हक्क असल्याने वडिलोपार्जित संपत्तीमध्येदेखील महिलांना समान हक्क असतो. हिंदू वारसा कायद्यानुसार मुलाप्रमाणे मुलीचाही वडिलांच्या संपत्तीवर हक्क असू शकतो. जर पालकांनी मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्यांना हा हक्क समान वाटून देण्यात येतो.

कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार

जर एखादी महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात गेली आणि तिच्याकडे दुर्लक्ष केले गेले अथवा तिची तक्रार नोंदवली गेली नाही तर ती याबाबत ती कायदेशीर कारवाई करू शकते. मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे.

महिला गुन्हेगाराबाबतचे अधिकार

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारानुसार सुर्यास्तानंतर कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही. शिवाय अटक झाल्यास ती का झाली हे जाणून घेण्याचा अधिकार तिला असतो. महिला गुन्हेगाराला फक्त महिला पोलीस कर्मचारीच अटक करू शकतात. महिलांसाठी भारतीय संविधानात अशा अनेक कायद्यांची तरतूद करण्यात आलेली आहे.

यावर्षीच्या जागतिक महिला दिनाची थीम काय?

विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशेष थीम बनवण्यात येते. जागतिक महिला दिनाची पहिली थीम सेलिब्रेटिंग ‘द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवली होती’ (Celebrating the past, Planning for the Future). यंदा ‘Women in Leadership: Achieving an Equal Future in a COVID-19 World’ अर्थात ‘नेतृत्व करणाऱ्या महिला : करोनाच्या काळात योगदान देणाऱ्या महिला’ ही आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *