Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकई-पाससाठी अर्ज आले २६ हजार; नाकारले १९ हजार

ई-पाससाठी अर्ज आले २६ हजार; नाकारले १९ हजार

नाशिक। प्रतिनिधी

ई-पास घेऊन परजिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होतात. मागील 22 दिवसात तब्बल 26 हजार 11 नागरिकांनी अर्ज सादर केले असून, अत्यावश्यक कारणे आणि त्यासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार अवघ्या सात हजार नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे…

- Advertisement -

मिशन बिगेन अंतर्गत जिल्हाबंदी घालण्यात आली असून, अत्यावश्यक कारण असेल तरच ई पास घेऊन नागरिकांना जिल्ह्याची सीमा ओलांडता येते.

परजिल्हा प्रवासासाठी ई पासेस सक्तीचे करण्यात आल्यापासून, ते मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज सादर होत आहेत. मात्र ई पास घेण्यासाठी आवश्यक ते ठोस कारण आणि कागदपत्रे सादर होत नसल्याने अर्ज नामंजूर होण्याचे प्रमाण सुद्धा मोठे आहे.

शहर पोलिसांनी 23 एप्रिल रोजी ई पास सुविधा सुरू केली. तेव्हांपासून पोलिसांकडे तब्बल 26 हजार 11 ई पासेस घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात आलेत. मात्र, बर्‍याचदा बंधनकारक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता नसणे, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पुरेसे ठोस कारण नसणे आदी कारणांमुळे ई पासेस नाकारले जातात.

ई पास नसताना तपासणी नाक्यावर नागरिक आढळून आल्यास सदर नागरिकांवर कारवाई करण्यात येते. गत वर्षी पेक्षा यंदा करोनाचा प्रसार फारच जास्त असून, अगदीच शुल्लक कारणांसाठी ई पासची मागणी आल्यास ती फेटाळून लावण्यात येते.

शहर पोलिसांनी ई पासेसला मंजुरी देण्याचे काम त्या त्या पोलिस ठाण्यांसह विशेष शाखेकडे सोपवले आहे. नागरिकांनी वेबसाईटवरून अर्ज सादर केला की त्या अर्जाची छाननी होऊन तो अर्ज मंजुरीसाठी संबंधित अधिकार्‍याकडे पोहचतो.

आतापर्यंत सादर झालेल्या 26 हजार 11 पैकी 19 हजार 118 जणांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत. तर, सहा हजार 893 जणांना अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर पोहचता आले. चारचाकी वाहनात तीन जणांच्या प्रवासास परवानगी असते.

त्यामुळे सहा हजार 893 अर्जांच्या आधारे जिल्हाबाहेर गेलेल्यांची संख्या निश्चितच सात हजारापेक्षा अधिक असू शकते असे अधिकार्‍यांनी सांगीतले आहे.

18 नाक्यांवर तपासणी

ग्रामीण पोलिसांनी 18 आंतरजिल्हा सीमांवरील आठ तपासणीनाक्यावर बंदोबस्त तैनात केला आहे.या ठिकाणी ई पासची तपासणी करण्यात येते तर शहरात सुद्धा संशयास्पद वाहनांची नाकाबंदी पाँईट्सवर चौकशी करण्यात येते. यामध्ये ई पास नसणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना जिल्हा प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या