अर्ली द्राक्षांना लवकरच विमा कवच

jalgaon-digital
2 Min Read

सटाणा । प्रतिनिधी Satana

देशाला परकीय चलन मिळवून देणार्‍या कसमादे पट्ट्यातील अर्ली द्राक्ष पिकाला लवकरच विमा कवच देण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक दृष्टीने विचार सुरु असल्याचे संकेत राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिले.

गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकाला बसत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे शासनाने या पिकाला विमा कवच द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. याबाबत थेट द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी टेंभे खालचे येथील सह्याद्री शेती उत्पादक गटच्या प्रांगणात राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली.

अध्यक्षस्थानी आ. दिलीप बोरसे होते. देशात अर्ली द्राक्ष पीक घेणारा हा एकमेव टापू आहे. त्यामुळे या पिकाला विमा कवच आवश्यक असून त्या दृष्टीने शासन पातळीवर जुलै महिन्यापासून विमा लागू करण्याबाबत विचार सुरु आहे असल्याचे धीरजकुमार यांनी स्पष्ट केले. अर्ली द्राक्ष पिकाला पावसापासून संरक्षण म्हणून प्लास्टिक अस्तरीकरणचा पर्याय सांगितला जात असला तरी शेतकर्‍यांची वेगवेगळी मते व अनुभव आहेत. याबाबत अभ्यास गट तयार केला जाईल. त्यानुसार अस्तरीकरणसाठी अनुदान योजना सुरु करण्यात येईल, असे सूतोवाचही त्यांनी केले.

आमदार दिलीप बोरसे यांनी अर्ली द्राक्षचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाने प्रयोगशाळा उभारण्याची मागणी केली. कोल्ड स्टोरेज, निर्यात केंद्राला चालना देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. तसेच द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याला वाचवण्यासाठी लवकरच विमा लागू करावा अशी मागणी केली. सह्याद्री शेती उत्पादक गटचे प्रमुख निलेश चव्हाण यांनी शेती उत्पादक गटांना थेट खत कंपनी मधूनच पुरवठा करण्याची मुभा द्यावी, तालुक्यात दोन ठिकाणी प्रयोग शाळा सुरु करण्याची मागणी केली. याप्रसंगी कृषी सहसंचालक संजीव पडवळ, कृषी अधीक्षक एस.आर. वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी डी. जे देवरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार आदी उपस्थित होते.

पुढचा काळ उत्पादक गटांचा

कृषी आयुक्त धीरजकुमार म्हणाले की, राज्यात आतापर्यंत तीन हजार शेती उत्पादक गटांची नोंदणी झाली आहे. गटस्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून 35 टक्के अनुदानावर प्रक्रिया उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कोल्ड स्टोरेज, निर्यात केंद्र, खरेदी विक्री केंद्र सुध्दा उभारता येणार आहे. शेतकर्‍यांनी त्यासाठी उत्पादक गटांची जास्तीत जास्त उभारणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *