जखमी कुत्र्याला मारहाण, पोलिसाविरोधात गुन्हा दाखल

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जखमी कुत्र्याला मारहाण केली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अंकुश बोडखे असे कर्मचार्‍याचे नाव आहे.

पिपल फॉर अ‍ॅनिमल फाउंडेशन (पीएफए) नगरच्या स्वयंसेविका अंतरा आण्णासाहेब हसे (वय- 20 रा. स्टेशन रोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, हसे या पिपल फॉर अ‍ॅनिमल फाउंडेशनच्या स्वयंसेविका म्हणून काम करतात. त्यांची मैत्रिण सिमरण मोटवाणी या देखील आधी पिपल फॉर अ‍ॅनिमल फांऊन्डेशनच्या स्वयंसेविका म्हणून काम करत होत्या. मात्र, काही कारणामुळे त्यांनी या संस्थेचे काम थांबविले होते.

मोटवाणी या नगर शहरातील मिस्किन मळा या ठिकाणी राहतात. सोमवारी दुपारी मोटवाणी यांच्या घराजवळील अपार्टमेंट परिसारात एका कुत्र्याला अज्ञात व्यक्तीने धडक दिल्याने तो जखमी झालेल्या अवस्थेत मोटवाणी यांना सापडला.

त्यानंतर हसे व मोटवाणी यांनी त्या जखमी कुत्र्याव उपचार केले आणि कुत्रा मोटवाणी यांच्या अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले. याच अपार्टमेंटमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी बोडखे यांनी त्या कुत्र्याला काठीने मारहाण केली. मारहाण झाल्याने फिर्यादी हसे व मोटवाणी यांनी त्या कुत्र्यावर उपचार केले.

पंरतू, उपचारादरम्यान त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. जखमी कुत्र्याला काठीने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादी हसे यांनी केला असून या विरोधात तोफखाना ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार तोफखाना पोलीसांनी पोलीस कर्मचारी बोडखे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *