Thursday, April 25, 2024
Homeधुळेरंगाची नव्हे, शब्दांची बरसात

रंगाची नव्हे, शब्दांची बरसात

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडच्या सोबत दै.देशदूतने धुलीवंदन निमित्त ‘रंग बरसे’ हा बहारदार कार्यक्रम घेतला.

- Advertisement -

सहभागी विविध कवी, गझलकार आणि कलावंतांनी या कार्यक्रमात रंगाची नव्हे तर शब्दांची अक्षरशः बरसातच केली. ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या कार्यक्रमाला हजारो श्रोत्यांंनी हजेरी लावली.

ज्येष्ठ कवी डॉ.रमेश जैन यांनी हिंदी, मारवाडी भाषेत सादर केलेल्या हास्यकवितांनी कार्यक्रमाला बहार आला. सदाबहार कविता सादर करुन त्यांनी अक्षरशः लोटपोट हसविले. तर मतीन अन्वर यांनी हिंदी भाषेत राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, मानवता या विषयांना धरुन सादर केलेल्या कवितांमुळे अंगावर रोमांच उभे राहिले.

अत्यंत पहाडी, कणखर आवाजात कलाम अन्वर या युवा कवीने सादर केलेल्या कविता म्हणजे या कार्यक्रमाची जान ठरली. आपल्या काव्याच्या माध्यमातून त्यांनी जितक्या सहज प्रेमाचे धागे उलगडले तितक्याच रोख-ठोक पणे शत्रु देश असलेल्या पाकिस्तानला खडेबोल सुनवले.

कमी वयात साहित्यात दमदार पदार्पण करुन आपले अस्तित्व निर्माण करणारी युवा कवयत्री दिया भालेराव हिने ‘बिन पते का खत’ सादर करीत हिंदी, उर्दु मिश्रीत काव्यातून एक-एक धागा उलगडला. आपल्या पत्रांच्या माध्यमातून मांडलेल्या भावना थेट हृदयात जावून बसल्या अर्थातच हे पत्र राधेने कृष्णाला लिहिलेले असले तरी प्रत्येक संवेदनशील मनाला एका वेगळ्या विश्वात नेणारे होते.

रंग बरसे या कार्यक्रमाची सुरुवात जाणता राजा या महानाट्यातील कलावंत तथा गायक संतोष ताडे यांनी सादर केलेल्या भक्तीगिताने झाली. ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे भक्तीगीत तितक्याच भक्तीभावाने सादर करीत त्यांनी वातावरण निर्मिती केली.

तर या संपूर्ण कार्यक्रमात खर्‍या अर्थाने रंग भरण्याचे काम पुर्वेश नितीन चौधरी या कलावंताने केले. अतिशय सुरेल पध्दतीने त्याने सादर केलेले बासरीवादन, त्यावरील सुमधूर धून, गाणी ही ऐकणार्‍या प्रत्येकाला स्वर लाटांवर तरंगत ठेवणारी ठरली. आग्रहास्तव पुन्हा दुसर्‍यांदा त्यांना बासरीवादन करण्यास भाग पडले.

दै.देशदूत आणि रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडने आयोजित केलेल्या या रंगबरसे कार्यक्रमाला एका माळेत गुंफण्याचे काम ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक, प्रा.विलास चव्हाण यांनी केले. मधून मधून चुटके, किस्से, कवीता नव्हे तर मार्मिक भाष्य करुन प्राध्यापक चव्हाण यांनी या संपूर्ण कार्यक्रमाला एका धाग्यात ओवले. अर्थातच त्यांचा भारदस्त आवाज, अभ्यास आणि मांडणी ही नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी आहे. याचा प्रत्येय या कार्यक्रमातही आला.

देशदूतचे धुळे, नंदुरबारचे ब्यूरोचिफ अनिल चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन यामागील उद्देश स्पष्ट केला. यंदा कोरोनाच्या संकटामुळे सगळेच सण, उत्सव साध्या पध्दतीने साजरे करावे लागत असल्याने यंदाचे धुलीवंदन झालेच नाही.

मात्र ही परंपरा खंडीत होवू नये, आपल्या दर्शकांना यानिमित्ताने मेजवाणी मिळावी याच उद्देशाने हा रंग बरसे कार्यक्रम घेण्यात आला. रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडचे अध्यक्ष महेश शिंदे यांनी कलावंत व सार्‍यांचे आभार मानले.

तसेच रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने तसेच ज्येष्ठांकडून मिळणार्‍या सूचनांनुसार स्थानिक पातळीवर रोटरीक्लब करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कोरोनाच्या काळात रोटरीने पुढाकार घेवून अनेक उपक्रम राबविले.

आता लसीकरण सेंटरही सुरु करुन एक पाऊल पुढे टाकले असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू छायाचित्रकार गोपाल कापडणीस यांनी सांभाळली तर नितीन कुलकर्णी यांनी त्यांना सहाय्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या