Friday, May 10, 2024
Homeनाशिकखरीप हंगामाला महागाईची फोडणी

खरीप हंगामाला महागाईची फोडणी

निफाड । प्रतिनिधी

केंद्र शासनाने पेट्रोलसह डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केल्याने त्याचा थेट परिणाम जिवनावश्यक वस्तूंसह खते, बियाणे, औषधे, किटकनाशके यासह सर्वच वस्तूंच्या किंमती वाढण्यावर झाला आहे.

- Advertisement -

साहजिकच यावर्षी खरीप हंगामासाठी खते, बियाणांचे भाव वाढले असून खरीप हंगामात यावर्षी सोयाबीनची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर होण्याचे संकेत मिळत असून त्यानंतर टोमॅटो, मका व लाल कांदा बियाणाला पसंती मिळत आहे. खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाने खतांचे नियोजन केले असून शेतकर्‍यांना थेट बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

खरीप हंगामाच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर गायब झालेला पाऊस अद्यापही बरसला नसल्याने यावर्षी खरिपाच्या पेरण्या उशिरा होण्याचे संकेत मिळू लागले आहे. बाजारपेठेत सोयाबीन बियाणामध्ये जे. एस.35 (30 किलो पॅकिंगमध्ये), के. एस. एल 441, आर. एस. 228, 9305, करिश्मा, इगल, व्हीगर आदी जातीचे बियाणे उपलब्ध असून मागील वर्षी 2500 ते 2800 रुपये प्रति गोणी मिळणारे हे बियाणे यावर्षी 3300 ते 3500 रुपये दराने विक्री होत आहे. तर मका बियाणामध्ये बायरचे डी. केसी 9141 (प्रति 4 किलो पॅकिंग), डी. के. सी. 9178, सी. पी. 333, सी.पी. 858, पंचगंगा, पायनर आदी बियाणे उपलब्ध असून हे बियाणे प्रती बॅग 1200 ते 1300 रुपये दराने विक्री होत आहे.

तर लाल कांदा बियाणांमध्ये चायना किंग यलोरा, पंचगंगा, पंचगंगा सुपर, रेडकिंग एक्सपोर्ट आदी बियाणे विक्रीसाठी दाखल झाले असून हे बियाणे प्रति किलो 2600 ते 2800 रुपये दराने विक्री होत आहे. तर कोथिंबीर लागवडीसाठी धने बियाणात आयजीएल, हरिष्मा, मालव, रामशेज, महेंद्रा, नामदेव उमाजी, नामधारी आदी जातीचे बियाणे विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे.

तूर बियाणामध्ये महाबीज डीएसएमआर 736, राजेश्वरी, डी.एन तर मुग बियाणांमध्ये यशोदा, धनवान, बॉम्बे सुपर, निर्मल, महाबिज आदी बियाणे विक्रीसाठी दाखल झाले आहे. मागील वर्षी अखेरच्या टप्प्यात बियाणांचा तुटवडा निर्माण झाला होता. साहजिकच यावर्षी अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी शेतकरी आतापासून बियाणे खरेदीची तयारी करताना दिसत असल्याने कृषी विक्रेत्यांकडे शेतकर्‍यांची गर्दी वाढू लागली आहे.

यावर्षी सोयाबीनला उच्चांकी दर मिळत असल्याने बहुतेक शेतकर्‍यांचा सोयाबीन पेरणीकडे कल दिसत असल्याने सोयाबीनचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तर लवकर येणारे पीक आणि जनावरांसाठी चारा म्हणून काही शेतकरी मका पिकाला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.

बाजारात मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, तूर, मूग, भुईमूग, कोथिंबीर आदी बियाणे उपलब्ध असले तरीदेखील शेतकरी सोयाबीन बियाणाला सर्वाधिक पसंती देताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल भाववाढीमुळे खते व बियाणांचे किंमतीत थोडीशी वाढ झाली आहे. पाऊस पडता झाल्यानंतरच पेरणीला वेग येईल.

दीपक कातकाडे, कृषी विक्रेते (निफाड)

- Advertisment -

ताज्या बातम्या