प्रतिबंधित क्षेत्रात बेशिस्तांची घुसखोरी

jalgaon-digital
1 Min Read

नवीन नाशिक । New Nashik प्रतिनिधी

माऊली लॉन्स ते अंबड हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. मात्र काही नागरिकांनी बॅरिकेट उघडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार घडल्याने जाणकारांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खुटवडनगर ते माऊली लॉन्स हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर याच पार्श्वभूमीवर प्रभाग 27 व 28 च्या काही लोकप्रतिनिधींनी स्थानिक नागरिकांसह, व्यापारी वर्ग तसेच पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन यांना सोबत घेत करोनाची साखळी सोडण्याकरिता माऊली लॉन्स ते प्रणव स्टेम्पिंग मुख्य रस्ता, अंबड गाव, अंबड भाजी मार्केट, महालक्ष्मी नगर, एकदंत नगर, फडोळ मळा, दातीर मळा हा परिसर 20 जुलैपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला.

त्यानुसार या परिसरात जाणारे सर्व लहान मोठे रस्ते बॅरिकेट लावून सील करण्यात आले मात्र येथीलच काही नागरिकांनी सदरचे बॅरिकेट उघडून पुन्हा याठिकाणी वाहतूक सुरळीत केली.

या ठिकाणी असलेल्या मेडीकलच्या व्यतिरिक्त इतर दुकाने अद्यापही बंद अवस्थेत आहेत. या परिसरात जर वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु आहे तर आम्हाला देखील दुकान सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असे मत येथील काही व्यवसायिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान याप्रश्नी आता मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *