Saturday, April 27, 2024
Homeनाशिकऊसावर तांबेराचा प्रादुर्भाव

ऊसावर तांबेराचा प्रादुर्भाव

करंजीखुर्द। वार्ताहर Niphad / Karanjikhurd

तालुक्यातील तीनही साखर कारखाने गेल्या काही वर्षापासून बंद असल्याने उभा ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागत असतांनाच आता ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

- Advertisement -

ऊसावर लाल तपकिरी टिपके पडून पाने वाळत आहेत. सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे ऊसाची वाढ खुंटली असून गोदाकाठचे नगदी पीक संकटात सापडले आहे.

अति पाणी आणि दलदल यामुळे गोदाकाठच्या शेतकर्‍यांना ऊस पिकाशिवाय पर्याय नाही. साहजिकच तालुक्याच्या याच भागात ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र असून दोन्ही साखर कारखाने गोदाकाठच्या भरवश्यावरच सुरू होते.

मात्र गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील साखर कारखाने बंद पडले अन् शेतकर्‍यांना आपला ऊस कारखान्याला तोडून देण्यासाठी बाहेरील साखर कारखान्यांकडे विणवन्या करण्याची वेळ आली. गेल्या दोन-चार वर्षापासून ऊस तोडणी मजूरांना पैसे द्यावे लागत आहेत.

जाड व पाण्याचा निचरा न होणार्‍या येथील जमिनीत दुसरे पिक घेता येत नाही अन् ऊस लावावा तर विक्रीसाठी नाना संकटे. आता तर ऊस पिकावर हुमणी, तुरा आदी रोगांबरोबरच यावर्षी तांबेरा रोगाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे.

त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झालेला पाऊस उघडण्याचे नाव घेत नसल्याने व दिवस-दिवस सूर्यदर्शन होत नसल्याने प्रकाश किरणाअभावी ऊसाची वाढ खुंटली आहे. सद्यस्थितीत आताचा काळ हा ऊस वाढीचा काळ असून याच काळात ऊसाची वाढ खुंटली आहे.

एकीकडे ऊस विक्रीची समस्या भेडसावत असतांनाच आता ऊसावर वाढता किडीचा प्रादुर्भाव डोकेदुखी ठरू पहात आहेत. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍याला पुन्हा सुगीचे दिवस येवून तालुक्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

बुरशीनाशके फवारावी

तांबेरा रोग नियंत्रणासाठी मॅकोझेब 3 ग्रॅम, 1 लि. पाणी अथवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा प्रोपीनेल थायोफिनेट मिथाईल या बुरशीनाशकाची आवश्यकतेप्रमाणे फवारणी करावी. तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.

जे.डी. पोफळे, कृषी सहाय्यक (म्हाळसाकोरे)

- Advertisment -

ताज्या बातम्या