Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशकात लहान मुलांसंदर्भातील संसर्ग कृती आराखडा तयार

नाशकात लहान मुलांसंदर्भातील संसर्ग कृती आराखडा तयार

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची आणि त्यात लहान मुलांना होणार्‍या संभाव्य संसर्गाचीच चर्चा सुरू आहे. ते लक्षात घेऊन नाशिकच्या बालरोगतज्ज्ञांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे. बालरोगतज्ज्ञांनी एकत्र येऊन एका विशेष कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. लहान मुलांना संसर्ग सुरू झालाच तर ती साथ कशा पद्धतीने हाताळायची यासंदर्भातील एक आराखडा या कृती दलाने तयार केला आहे. तो आम्ही जिल्हाधिकार्‍यांनाही सादर केला आहे, अशी माहिती या कृती दलाचे सदस्य डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली. ते आयएमएच्या महाराष्ट्र राज्य कृती समितीचे देखील अध्यक्ष आहेत…

- Advertisement -

आराखड्यात अनेक मुद्दयांचा परामर्श

तिसर्‍या लाटेत जर मुलांना संसर्ग झालाच तर, याचा विचार करून अनेक मुद्यांचा आणि समाजात निर्माण होणार्‍या संभाव्य प्रश्नांचा जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या अहवालात विचार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांची संख्या, रुग्णालये, त्यातील सुविधा, संसर्गाची लक्षणे, तपासण्या, रुग्णालयात कोणाला दाखल करायचे, अति दक्षता विभागात कोणाला दाखल करायचे, बाळाला अंगावर दूध पाजायचे की नाही, कोणाला घरीच आयसोलेशनमध्ये ठेवायचे, औषधोपचार असे अनेक मुद्दे त्यात आहेत. अगदी शाळा सुरु करता येईल का, इथपर्यंत त्यात परामर्श घेतला आहे.

लहान मुलांमधील संभाव्य संसर्गाची फक्त चर्चाच!

तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल या चर्चेला सध्या तरी कोणताही शास्त्रीय आधार नाही. तथापि काही तर्काच्या आधारे असे बोलले जात आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठाना संसर्ग झाला. तेव्हा मुले घरातच होती. दुसर्‍या लाटेत तरुण आणि जास्त प्रमाणात लोक संसर्गित झाले. या काळात ज्येष्ठांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले असेल. फक्त मुलांचे लसीकरण झालेले नसेल आणि ते असुरक्षित असतील (व्हल्नरेबल) असे मानले जात होते. पण तसे झाले नाही. दुसर्‍या लाटेत घरोघरी रुग्ण आढळत आहेत. त्यांच्याकडून लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली आहे.

पालकांनी घाबरून जाऊ नये!

या चर्चेचा सर्वात जास्त परिणाम पालकांवर होऊ शकतो. त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्यांनी घाबरायचे अजिबात कारण नाही. लहान मुलांवर अधिकचे निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही. त्यांनी दक्षता मात्र घ्यायला हवी. याउपरही संसर्ग झालाच तर लहान मुलांमध्ये तो माईल्ड असतो. 90 टक्के वेळा तर त्याला काहीच होत नाही. लक्षणे कमीच असतात. जवळजवळ नसतात. हे पालकांना समजावून सांगण्यासाठी आणि त्यांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी आम्ही एक वेबिनार देखील घेतला. मुलांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी बाहेरून काही देण्याची गरज नाही. घरगुती चांगला आहार, स्वच्छता आणि शांत झोप हाच महत्वाची. याबरोबरच त्यांना आजारी आणि बाहेरच्या माणसांच्या संपर्कात येऊ देऊ नका. पालकांनी एवढी काळजी घेतली तरी पुरे. हेही आम्ही पालकांना समजावून सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या