Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedदेशी ज्ञानभांडारच पर्यावरणपूरक

देशी ज्ञानभांडारच पर्यावरणपूरक

– डॉ.राजेंद्र सिंह, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ

एकेकाळी जंगलतोड करून शेती करणे क्रांतिकारक मानले जात होते. देशातील विहिरी आणि तलाव हे नारू रोगाचे आश्रयस्थळ आहे, असे मानून ते बुजविण्याचा प्रयत्न केला जात असे आणि त्यावर कोट्यवधींचा खर्चही केला जात असे.

- Advertisement -

आज आपल्या जुन्या चालीरीतींना संयुक्त राष्ट्रांकडून ‘बेस्ट प्रॅक्टिस’ म्हणजेच सर्वोत्तम सवयी म्हणून गौरविले जात आहे. तलाव आणि विहिरी बुजविण्यापूर्वी केवळ एकदोन संशोधने न करता आजवरचा इतिहास-भूगोल, समाजाची गरज आणि जलाशयांची आवश्यकता एवढा अभ्यास केला असता, तरी पुष्कळ झाले असते.

आजच्या प्रचलित तंत्रज्ञानाने विकासाच्या नावाखाली विस्थापन, समतोल बिघडविणे आणि विनाशच अधिक केला आहे. प्राचीन काळात भारत संवेदनशील, अहिंसक विज्ञानाच्या आधारेच पुढे चालला होता. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी जेव्हा संवेदनशील विज्ञानाच्या हातात हात घालून चालते, समग्रतेचा विचार करून निर्मिती केली जाते, तेव्हाच विस्थापनमुक्त, विकृतीमुक्त आणि विनाशमुक्त असा चिरस्थायी विकास होतो. या संपूर्ण प्रक्रियेद्वारे नित्य-नूतन निर्मिती होत राहणे म्हणजेच सनातन विकास होय. यालाच आपण नवीन चिरस्थायी तंत्रज्ञान आणि विनाशमुक्ती हेच नवे अहिंसक तंत्रज्ञान म्हणू शकतो. या अहिंसक तंत्रज्ञानानेच जलवायू परिवर्तनाच्या नव्या संकटापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. अशा तंत्रज्ञानाचा आणि अभियांत्रिकीचा आधार भारतीय ज्ञानतंत्र हाच असू शकतो.

‘भ-भूमी, ग-गगन, व-वायू, अ-अग्नी आणि न-नीर’ अशी ‘भगवान’ या शब्दाची निर्मिती झाल्याचं मानलं जातं. सर्वसामान्य नागरिक ‘नीर-नारी-नदी’ यांना नारायण मानत होते. हीच भारतीय श्रद्धा आणि पर्यावरण आहे. पर्यावरण विज्ञान हे संवेदनशील, अहिंसक विज्ञान आहे. याला आपण ‘आध्यात्मिक विज्ञान’ असेही म्हणू शकतो. आधुनिक विज्ञान केवळ गणना आणि समीकरणे या गुंत्यात अडकून संवेदनशून्य विज्ञानाची निर्मिती करते. भारतीय ज्ञान-विज्ञान अनुभूतीच्या टप्प्यात येईपर्यंत संवेदनशील, अहिंसक बनते. श्रद्धेच्या विज्ञानानेच भारतीय पर्यावरणाचे संरक्षण आजवर केले आहे. नव्या विज्ञानाच्या शोधांमधून जेव्हा श्रद्धा आणि संवेदना गायब झाली, तेव्हापासून उद्भवलेल्या जलवायू संकटाने हिमालयातील आपत्तींचे चक्र अधिक गतिमान झाले आहे. सत्याचा क्रमबद्ध शोध हेच खरे विज्ञान आहे. गरज ही शोधाची जननी असते हे खरे; परंतु जेव्हा संशोधन करणार्‍याच्या संवेदना आपला परिसर आणि मानवता यातील संबंधांचा आदर करून त्यात समृद्धी आणण्याच्या हेतूने संशोधन करण्याचा हेतू असेल तरच!

समृद्धी ही केवळ मानवासाठी असेल आणि ती मानव-निसर्ग नात्यात दरी निर्माण करेल. अशा स्थितीत संशोधन करणारा अणुबाँब बनवेल आणि तिसरे महायुद्ध घडवून आणेल. संशोधन करताना जेव्हा मानवी संवेदना कायम राहतात तेव्हा त्या संशोधनातून आरोग्यरक्षक आयुर्वेदाची निर्मिती होते. हे विज्ञान मानवाला नैसर्गिक औषधांनी निरोगी राहण्याची, अधिक जगण्याची आणि नैसर्गिक रक्षणाची शक्ती प्रदान करून सामूहिक भवितव्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करते. हे विज्ञान मानवाच्या आरोग्यात कधीच बिघाड करणार नाही. उलट मानवजात आणि निसर्ग या दोहोंचे आरोग्य उत्तम राखून सद्भावनेने काम करत राहील. हीच आपली समग्र दृष्टी होती. याच दृष्टीमुळे आपल्याला जेवढा अनुभव येतो, तेवढेच आपण बोलतो. म्हणूनच आपले सगळे वेद, उपनिषदे आपल्याला असा संदेश देतात, जणू एखादी अनुभवी व्यक्ती आपले अनुभवकथन करीत आहे. ही अभिव्यक्ती त्या काळातील काही निवडक लोकांचीच असेल, ऋषी-मुनींचे अनुभव असतील; परंतु अनुभवातूनच शास्त्रे बनत होती आणि लिहिली जात होती. पुढील पिढी त्या शास्त्रांचे पालन करीत असे. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले ते सखोल अनुभव होते.

आजची शास्त्रे केवळ कल्पना, गणना, क्रिया-प्रतिक्रिया या आधारावर लिहिली जातात. अनुभव किंवा अनुभूतीचा संबंध त्यात नसतो. ज्याच्या मनात जी कल्पना येते, ती तो बोलून दाखवतो आणि त्याप्रमाणे कृती करू लागतो. त्यामुळेच एकेकाळी जंगलतोड करून शेती करणे क्रांतिकारक मानले जात होते. देशातील विहिरी आणि तलाव हे नारू रोगाचे आश्रयस्थळ आहे, असे मानून ते बुजविण्याचा प्रयत्न केला जात असे आणि त्यावर कोट्यवधींचा खर्चही केला जात असे. आज आपल्या जुन्या चालीरीतींना संयुक्त राष्ट्रांकडून ‘बेस्ट प्रॅक्टिस’ म्हणजेच सर्वोत्तम सवयी म्हणून गौरविले जात आहे. तलाव आणि विहिरी बुजविण्यापूर्वी केवळ एकदोन संशोधने न करता आजवरचा इतिहास-भूगोल, समाजाची गरज आणि जलाशयांची आवश्यकता एवढा अभ्यास केला असता, तरी पुष्कळ झाले असते. निसर्गाच्या बरोबरीने चालण्याची कामना आणि सद्भावनेचा जन्म आत्मिक ऊर्जा आणि संवेदनांमधून होतो, तर अणुबाँबचा जन्म शक्तीतून (पॉवर) होतो. शक्ती वाढविण्याच्या इच्छेतून शक्तीविषयी संशोधन केले जाते आणि त्याचा उपयोगही आपण ताकदवान बनण्यासाठीच करतो. शक्तीतून युद्ध होते.

निसर्गविषयक भारतीय आकलनात ऊर्जा होती. तेच भारतीय ज्ञान जगाला ‘वसुधैव कुटुंबकम’

म्हणून एकत्र आणण्याच्या ऊर्जेने ओतप्रोत होते. त्यामुळेच पूर्वीच्या काळी जैसलमेरसारखे कमी पर्जन्यमान असलेले शहर वॉशिंग्टनपेक्षा मोठे व्यापारी केंद्र बनले होते. बर्‍याच कालावधीपर्यंत आपण या रस्त्याने आपण काबूल, कंदाहार, कजाकिस्तान, म्यानमार आदी देशांशी उंटावरून व्यापार करीत होतो. ते ऊर्जेचेच प्रतीक होते. ऊर्जा आणि शक्ती यात भेद करणे आजकाल आपण सोडून दिले आहे. शक्ती व्यक्तिगत लाभासाठी वापरली जाते आणि ऊर्जा शुभ गोष्टींसोबत वाटचाल करते. त्यामुळे शक्ती विनाशाच्या दिशेने तर ऊर्जा सुरक्षिततेच्या आणि समृद्धीच्या दिशेने नेणारी ठरते. मानवाप्रमाणेच निसर्गाचे हक्क यात समानता असणे हेच सत्य आहे.

परंतु मानवी बुद्धीमध्ये जेव्हा अतिक्रमण करणार्‍या व्यवस्थापकीय शिक्षणाचा प्रभाव वाढतो, तेव्हा तो निसर्गाच्या हक्कावर कब्जा करतो. जेव्हा तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचे कौशल्य वाढते तेव्हा मनुष्य निसर्गाचे शोषण सुरू करतो. जमिनीत उत्खनन करतो. नद्यांचे स्वातंत्र्य नष्ट करतो आणि त्यांचेही शोषण सुरू करतो. जेव्हा हे सर्व मानवी व्यवहारात आणि संस्कारात प्रविष्ट होते तेव्हा जमीन, नदी, जल, जंगल, जीवन या नैसर्गिक घटकांचे केवळ शोषण सुरू होते. शोषण ही संस्कृती नव्हे तर सभ्यतेचा भाग बनते.

जमिनीखालील पाण्याचे साठे उपयुक्त करण्याच्या नावाखाली या पाणीसाठ्यांचे प्रदूषण आणि अतिक्रमण होत आहे. सुंदर शब्दांची

निर्मितीच आज अतिक्रमण करण्यासाठी उपयुक्त बनत चालली आहे. ही मानवी शक्ती, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी याद्वारे हे अतिक्रमण वाढविण्यात येत आहे. ऊर्जावान लोक अतिक्रमण करत नाहीत. ते सदैव निर्मितीची नित्य-नूतन आवर्तने निर्माण करतात. नित्य-नूतन निर्मितीमध्ये हिंसा होत नाही. ही सदैव शक्तिमय अहिंसक सृजनप्रक्रिया आहे. आज सृजन प्रक्रिया रोखून संपूर्ण ब्रह्मांडात प्रदूषण वाढविले जात आहे. केवळ नैसर्गिक प्रदूषण वाढले आहे असेही नाही. आपल्या शिक्षणाने मानवी सभ्यता आणि सांस्कृतिक प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे. अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीनही घटकांची वाढ आपल्या आधुनिक शिक्षणामुळेच झाली आहे. जेव्हा विखंडित शिक्षण अस्तित्वात येते, तेव्हा आर्थिक लालूच आणि लोभ वाढून हिंसक रूप धारण करतो. अतिक्रमण,

शोषण, प्रदूषण हे आपल्या हिंसक शिक्षणाचेच परिणाम आहेत.

अतिक्रमण ही तर आपल्या व्यवस्थापकीय शिक्षणाची प्रमुख देणगी आहे. सर्व व्यवस्थापकांना रीतसर तसेच शिकविले जाते. बुद्धिकौशल्याच्या आधारावर निसर्ग आणि मानवतेशी संबंधित संसाधनांवर नियंत्रण करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित केली जाते. बुद्धी मग त्याच दिशेने काम करू लागते. मानवी संसाधने आणि शक्ती वाढवून त्यावर जे नियंत्रण ठेवू शकतात, तेच विकसित म्हणून ओळखले जातात. ही प्रक्रिया हिंसक शक्तीने सुरू होते. त्यामुळे तीत हिंसा, लूटमार होणे अभिप्रेतच असते. नद्यांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या वापराचा हक्क याविषयी कुणालाच चिंता नाही.

जे शक्तिशाली आहेत, तेच त्यांचे शोषण करतात. सदुपयोग आणि पोषण संपुष्टात येऊन त्याजागी अतिशोषण सुरू होते. शोषणाचा हा भाव आपल्या मनात निर्माण करतात तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी याद्वारे तयार झालेली यंत्रे! गणनांनुसार होणारे संशोधन हे आपल्या सामुदायिक गरजांपासून दूर, भावना आणि संवेदनारहित लाभ आणि एकमात्र कर्त्याचा स्वार्थ पूर्ण करणारे ठरते, असे म्हणता येते. गणनांमुळे हिंसक शक्तींचे विज्ञान तयार होते. या विज्ञानात निसर्ग आणि मानवजाती यांच्या एकत्रित हिताचा विचार केलेला नसतो. त्यामुळे आज सर्व प्रकारचे विज्ञान युद्धांच्या आणि विनाशाच्या दिशेने जाणारेच निर्माण होत आहे.

आजही केवळ संवेदनशील विज्ञानच आपल्याला खर्‍या अर्थाने पुढे नेऊ शकते. आपण संपूर्ण जगाला नवीन काही शिकवू शकतो. जलवायू परिवर्तनाच्या आधुनिक नैसर्गिक संकटाचे निराकरण या मार्गानेच होऊ शकते. म्हणून तेच खरे विज्ञान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या