Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगकोलंबसाने शोधलेला भारत...

कोलंबसाने शोधलेला भारत…

केप ऑफ गुड होपपर्यंत

बार्तुलुम्यू दियास यशस्वीपणे पोहचला. सन 1487 सालची ही घटना तत्कालिन युरोपात तशी खळबळ उडवणारी ठरली. धर्मसत्ता व राजसत्ता दोन्हींना भारतीय उपखंडासमवेतच नवनवीन भूभागांच्या शोधात रस वाटू लागला. युरोपात बदलाचे वारे वाहू लागले होते. अशावेळी राजसत्तेला धर्मसत्तेचा असलेला अंकुश झुगारायचा होता. दुसर्‍या बाजूला धर्मसत्तेला आपल्या हातून युरोपाची लगाम सुटण्याच्या भीतीनं ग्रासले होते. धर्मसत्तेने आपली युरोपावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी एक डाव खेळला. केप ऑफ गुड होपच्या शोधाच्या पाच वर्षांनंतर पोपने एक आज्ञापत्र प्रसिद्ध केले.

- Advertisement -

त्यानुसार अटलांटिक महासागराची विभागणी

स्पेन व पोर्तुगाल यांच्यात करण्यात आली. महासागाराला उत्तर व दक्षिण अशा दोन भागात विभागण्यात आले. उत्तर भागात अपरिचित देशांचा वा भूभागांचा शोध घेण्याचा अधिकार स्पेनला मिळाला. दक्षिण भागाचा मालक पोर्तुगालला करण्यात आले. आज्ञापत्राचा अन्वयार्थ लावल्यास पोप व चर्चचा हेतू लक्षात येतो. त्यानुसार महासागरावर देखील चर्चची सत्ता असल्याची जाणीव राजसत्तेला करून देणे.

स्पेन व पोर्तुगाल यांच्यात महासागराची विभागणी

करून युरोपातील देशांमध्ये वैर भावना तीव्र करणे. या वैराने राजसत्ता एकमेकांशी झुंजत राहतील व चर्चची सत्ता अबाधित राहिल याची व्यवस्था करणे. अशी योजना पोप व चर्च यांची होती. युरोपात सागर सफरींचे आर्थिक-व्यापारी महत्व सर्वप्रथम पोर्तुगाल व स्पेन यांच्याच लक्षात आले होते.

पोपच्या आज्ञापत्राच्या

मागे या दोन राजसत्तांचा हात असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसे पाहिले तर यावेळी संपूर्ण युरोपिअन समाज धार्मिक क्रांतीच्या पर्वातून चालला होता. जीवनाच्या क्षेत्रात होणारे विविध बदल हे प्रस्थापित व्यवस्थेला मोडकळीत काढत असतात, तसेच विकासाच्या नवीन संधींची शक्यता निर्माण करत असतात. नवनवीन भूभागांच्या शोधासाठी आयोजित करण्यात येऊ लागलेल्या सागरी मोहिमांमधून युरोपात एका नव्या करिअरची संधी निर्माण झाली. हे करिअर म्हणजे दर्यावदी म्हणून भाग्य आजमवणे. दुर्दम्य साहस व सागरी मोहिमांचे ज्ञान या प्रमुख पात्रता दर्यावदी होण्यासाठी आवश्यक होत्या. दर्यावदींसोबत ईतर अनेकांना रोजगार मिळणार होता. दर्यावदींना तर नव्याने शोधलेल्या भूभागाचा शासक होण्याची संधी देखील मिळणार होती.

त्यामुळे स्पेन, पोर्तुगाल, इटली

सारख्या देशांमध्ये दुर्दम्य साहस, प्रचंड आत्मविश्वास व अविचल आशावाद असणारे काही लोक दर्यावदी म्हणून स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी धडपडू लागले. यातच एक होता, ख्रस्तोफर कोलंबस. इटलीच्या जेनोवो शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1451 साली कोलंबसचा जन्म झाला. त्याच्यापूर्वी सुमारे दोनशे वर्षे आधी होऊन गेलेला मार्को पोलो हा दर्यावदी त्याचा आदर्श होता. युरोप व आशिया यांना जोडणारा प्राचीन अशा ‘सिल्क रूट’ (रेशीम मार्ग) वरुन सर्वप्रथम प्रवास करणार्‍या युरोपिअनांमध्ये मार्को पोलोचा समावेश होतो.

चीन, भारत, ईराण

इत्यादी आशियायी देशांना त्याने भेट दिली होती. ‘द बुक ऑफ सर मार्को पोलो’ हे त्याने लिहिलेले प्रवासवर्णन 13 व्या शतकातील भारताच्या आर्थिक व राजकीय परिस्थितीचा इतिहास जाणण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. मार्को पोलो आणि त्याचा प्रवास यापासून प्रेरणा घेतलेला युवा कोलंबस,दर्यावदी म्हणून नशीब आजमवण्यास पेटून उठला. नव्या भूमीचा शोध घेण्याचा ध्यास त्याने घेतला.

टास्कनेली नावाच्या इटालियन अभ्यासकाच्या

पृथ्वी गोल आहे आणि युरोपाच्या पश्चिम समुद्र किनार्‍याच्या मार्गाने आपण पूर्वेकडील देशांकडे जाऊ शकतो या सिद्धांताचा प्रभाव कोलंबसावर पडला. अशाप्रकारे आपण भारतपर्यंत पोहचू शकतो,असा ठाम विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. सागरी मोहिमेचा काही अनुभव गाठीशी असेलेल्या आणि साधन-संपत्तीचा अभाव असलेल्या कोलंबसाला यासाठी राजाश्रय हवा होता. पोर्तुगालच्या राजाकडे त्याने अनेक वेळा मदतीसाठी याचना केली. दरवेळी त्याच्या पदरी निराशाच आली. अखेर त्याने स्पेनच्या राजाकडे यासंदर्भात याचना केली. पोपचे आज्ञापत्र प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्याची कल्पना असलेला स्पेनचा सम्राट प9ॠर्निनांद आणि सम्राज्ञी इसाबेल यांनी कोलबंसाची मागणी मान्य केली.

कारण कोलंबसला भारताच्या शोधासाठी

दक्षिणेकडे जावे लागणार होते आणि दक्षिण अटलांटिक महासागरावर कदाचित पोर्तुगालचे स्वामीत्व मान्य करण्यात येणार होते. त्यामुळे आधीच संधी साधावी असा विचार सम्राट व सम्राज्ञीने केला असावा. कोलंबसाच्या भारत शोध सागरी मोहिमेचे प्रायोजक होतांना, स्पेनच्या सम्राटाने त्याच्याकडून एक करार करून घेतला. त्यानुसार कोलंबस ज्या भूमीचा शोध लावेल त्या भूमीवर स्पेनच्या राजाचा अधिकार असेल.

कोलबंस राजाच्या वतीने मुख्य प्रशासक म्हणून तेथे काम करेल आणि तेथील एकूण महसुलातील 10 टक्के भाग स्पेनच्या राजाला द्यावा लागेल. कोलंबसने करारातील सर्व अटी मान्य करणे हाच एक मार्ग, त्याच्या भारताकडे जाण्याचा मार्गाला प्रशस्त करू शकत होता. करारातील सर्व अटी त्याने मान्य केल्या.

3 ऑगस्ट 1492 ला निना, संतामारिया आणि पिंटा

या तीन जहाजांसह कोलंबस महासागरावर स्वार झाला. त्याच्यासोबत 90 खलाशी होते. प्रवास सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी कोलंबस आणि त्याच्या सहका-यांना भूमीचे दर्शन होईना. त्याच्या सहकार्‍यांचा धीर खचू लागला आणि ते परतण्याची भाषा करू लागले. त्यांचे मनोधैर्य टिकवण्याचे आव्हान स्वीकारत, त्याने प्रवास सुरू ठेवला. त्याच्या संयमाचे फळ त्याला लवकरच मिळाले. अखेर 12 ऑक्टोबर 1492 ला त्याला जमिनीचे दर्शन झाले.

त्याने भारताचा शोध लावला होता.

भारताच्या पूर्व किना-यावरील एखाद्या बेटावर आपण पोहचलो आणि तेथील स्थानिक रहिवाशांना म्हणजेच भारतीयांना भेटलो याचा त्याला अत्यानंद झाला. त्याने या बेटाचे ‘सॅन सल्व्हाडोर’ असे नामकरण केले. या भूमीवर त्याने स्पेनची पहिली वसाहत स्थापन केली. बेटावरील भारतीयांनी त्याचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले आणि पाहुणचार केला. ज्याची परतफेड कोलंबसाने आपल्या पुढील सफरींमध्ये त्यांचा छळ, कत्तल आणि त्यांच्या संस्कृतीचा सर्वनाश करून केली.

यानंतर कोलंबसाने भारताच्या आणखी तीन सफरी केल्या.

1498 च्या सफरीत त्रिनिदाद आणि 1503 च्या सफरीत होन्डुरास, पनामा आणि अकापुल्को याठिकाणी स्पॅनिश वसाहती स्थापन करण्यात यश मिळवले. कोलंबस, स्पेनचा सम्राट आणि स्पॅनिश जनता यांचा आपण भारताचा शोध लावला हा फार मोठा गैरसमज ठरला. कोलंबसाच्या मृत्यूपर्यंत हा गैरसमज कायम होता. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दर्यावदींनी त्याने शोधलेल्या भारताच्या भूमीच्या सागरसफरी केल्या. अखेर त्यांना समजले की कोलंबसाने शोधलेली भूमी म्हणजे भारत नव्हे. हा आपल्याला अज्ञात असा भूखंड आहे.

त्यालाच नंतर अमेरिका संबोधण्यात आले.

खरे तर कोलंबस अमेरिकेच्याही मुख्य भूमीपर्यंत कधीच पोहचू शकला नाही. तो केवळ अमेरिकेजवळील बेटांवर पोहचला होता. कोलंबसाला हा शोध अपघातानेच लागलेला होता. एक मात्र खरे की कोलंबसाच्या या प्रयत्नांमधून युरोपला अमेरिका खंडाचा मार्ग मिळाला आणि अमेरिकेजवळील बेटांवर प्रारंभीच्या युरोपिअन वसाहती स्थापन झाल्या. यामुळेच अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये आजही 12 ऑक्टोबर हा ‘कोलंबस दिन’ म्हणून साजरा केला जातो. कोलंबसाच्या इतिहासातील काळोख आणि त्याचे अपयश सर्वमान्य आहे. तरीही महासागराला देखील त्याच्या किना-याची जाणीव करून देत पामर ठरवणार्‍या अमर्याद साहस, आशावाद व महत्वकांक्षा असलेल्या मानावाच्या गर्वाचे प्रतिक म्हणून तो जगात अजरामर झाला आहे. यामुळेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना देखील कोलंबसाचे गर्वगीत गाण्याचा मोह आवरला नाही.

-प्रा.डॉ.राहुल हांडे,

भ्रमणध्वनी-8308155086

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या