Friday, April 26, 2024
Homeनगरस्थानिक पातळीवर गावनिहाय स्वतंत्र पाणी योजना मंजूर करा

स्थानिक पातळीवर गावनिहाय स्वतंत्र पाणी योजना मंजूर करा

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

हातगावसह 28 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेबाबत संताप व्यक्त करत या योजनेतून आतापर्यंत पाण्याचा एक थेंबही न मिळाल्याने ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर गावनिहाय स्वतंत्र पाणी योजना मंजूर करावी, अशी मागणी या योजनेतील सर्व गावांच्या सरंपचांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अधीक्षक अभियंता व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

या योजनेतील सरपंच व ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता वायकर, ग्रामिण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता अनंत रुपनर, गट विकास अधिकारी महेश डोके, अनिल सानप यांनी शेवगाव पंचायत समितीमध्ये आज बुधवार (दि. 5) रोजी आढावा बैठक घेतली. यावेळी सरपंचांनी या योजनेबद्दल व ती चालवणार्‍या जीवन प्राधिकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त करत स्वतंत्र पाणी योजना चालविण्याची परवानगी मागितली.

या योजनेचे व्यवस्थापन पाहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पुन्हा प्रस्ताव तयार करून शासनाचा खर्च वाया घालण्याची तयारी सुरु केली आहे. योजनेत प्रस्तावीत केलेला खरडगाव आखेगाव या गावांना शेवगाव योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेतील सर्व 28 गावांना गावनिहाय स्वतंत्र पाणी योजना मंजूर करून शासनाच्या निधीचा योग्य विनियोग करावा, अशी मागणी सरपंच नितेश पारनेरे, अरुण मांतग, गणेश कापसे, प्रल्हाद देशमुख, संतोष नांगरे, विठ्ठल गायके, अमोल काकडे, राहुल देशमुख आदींनी केली आहे.

यावेळी सुगंध खंडागळे, काकासाहेब तहकिक, जगन्नाथ मार्केंडे, पोपट गावडे, गंगुबाई गायके, अदिनाथ सुरवसे, रवींद्र कातकडे, साईनाथ गरड, भाऊराव भिसे, परमेश्वर तेलोरे, रामकिसन मडके आदीं सरपंचासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंचांच्या रुद्र अवतारापुढे उपस्थित अधिकार्‍यांनी 15 दिवसांत बैठक घेऊन याबाबत गावांना योग्य न्याय देऊन तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

थेंबभर पाणी नाही

जायकवाडी धरणाचे उद्भव असलेली व 1999 ला मंजुरी मिळालेली तालुक्याच्या पूर्व भागातील हातगाव व 28 गावाच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर आतापर्यंत 8 कोटी 50 लाख रुपये खर्च झालेला आहे. मात्र मूळ कामे पूर्ण न केल्याने संबंधित गावांना थेंबभर देखील पाणी मिळालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा या योजनेला विरोध आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या