Friday, April 26, 2024
Homeनाशिकदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘स्वतंत्र’ विभाग

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘स्वतंत्र’ विभाग

नाशिक । Nashik भारत पगारे

दिव्यांग विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या केंद्र व राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक सवलतींबाबत जागृती करणे, तसेच प्रत्येक विद्यापीठे आणि शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर या योजना आणि सवलतींची माहिती देण्यासाठी ‘स्वतंत्र’ विभाग ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी याबद्दल सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू व उच्च शिक्षण संस्थांना पत्र पाठविले आहे.

- Advertisement -

राज्यसभेच्या संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारला केलेल्या शिफारशींचा दाखला देऊन आयोगाने याबद्दल पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर या योजना आता ठळकपणे दिसतीत, यातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होण्यास हातभार लागणार आहे.

संसदीय स्थायी समितीने उच्च शिक्षणासाठी 2020-21 करिता निधी मागणीवर अहवाल दिला आहे. यात मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योजनांबाबत समाधान व्यक्त करताना, या पुढाकारामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळाली आहे.

या योजनांबाबत अधिक जनजागृती केली, तर त्याचे प्रभावी परिणाम दिसतील. त्यामुळे शैक्षणिक संधीबाबत दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रत्येक प्रयत्न केला पाहिजे, असे म्हटले आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या सर्व योजनांचा तपशील हा विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, सर्व विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करावे. तसेच या योजनांची योग्यरितीने प्रत्येक शिक्षण संस्थेत अंमलबजावणी होते की नाही यावर काटेकोर आणि सातत्याने लक्ष ठेवण्याची गरजही समितीने व्यक्त केली आहे.

शिक्षण हे आता वैश्विक होत आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणावर भर दिला पाहिजे. यातून त्यांना नव्या संधी निर्माण होतील. याबरोबरच जागतिक दर्जाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांनी त्यांच्याकडील मनुष्यबळ सक्षम केले पाहिजे.

शिक्षणात दर्जाला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. सध्याच्या काळासाठी गरज असलेले, नवे कौशल्य आणि व्यापक ज्ञान असलेले पदवीधर निर्माण केले पाहिजेत, असे मत स्थायी समितीने नोंदविले आहे.

दिव्यांगांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था याविषयी कशा प्रकारे कार्यवाही करतात, शैक्षणिक योजनांची माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट करतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या