Friday, April 26, 2024
Homeनगरचांद्यात लॉकडाऊन वाढविल्याने ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

चांद्यात लॉकडाऊन वाढविल्याने ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथे गेली दहा दिवसापासून असलेल्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ झाल्याने चांदा ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. काल गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन केले. लॉकडाऊन तातडीने मागे न घेतल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी दिला. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना जिल्हाधिकार्‍यांपर्यंत कळवल्या जातील असे सांगितले.

- Advertisement -

चांदा येथे मागील दहा दिवसांपासून करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता गाव संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याची मुदत आज संपणार होती. मात्र कालच त्यामध्ये वाढ करून लॉकडाऊन वाढविण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थ सर्वपक्षीय पदाधिकारी आणि व्यापारी यांना समजताच गावात प्रचंड असंतोष निर्माण झाला.

सर्व ग्रामस्थ सर्वपक्षीय पदाधिकारी गावातील सर्व व्यापारी सकाळी चांदा ग्रामपंचायत समोर जमा झाले. त्याच ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. सदर घटनेची खबर नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना समजताच ते चांदा येथे हजर झाले.

ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. गावात रुग्णांची चुकीची माहिती देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत होते. प्रत्यक्षात असलेली रुग्णसंख्या आणि दाखवण्यात आलेली रुग्ण संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.

यावेळी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे म्हणाले की आरोग्य विभागाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका गावाला बसत असून गावातील छोटे-मोठे व्यापारी यांचे अतोनात नुकसान होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतकरी वर्गांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील सद्यस्थितीची रुग्णांची संख्या अत्यंत कमी असताना सुद्धा लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेली वाढ ही चुकीची असून ती तातडीने मागे न घेतल्यास थेट मंत्रालयावर ग्रामस्थांसह मोर्चा काढण्याचा इशारा श्री. दहातोंडे यांनी यावेळी दिला. जोपर्यंत लॉकडाऊन मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही असा निर्धार यावेळी श्री. दहातोंडे यांच्यासह गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला.

यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी ग्रामस्थांच्या आणि पदाधिकार्‍यांच्या तीव्र भावना लक्षात घेत सद्यस्थितीची रुग्णांची माहिती वैद्यकीय विभागाकडून घेत सदर माहिती ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिलराव अडसुरे, मुळा चे संचालक बाबुराव चौधरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहनराव भगत, राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष भाऊसाहेब जावळे, माजी सरपंच संजय भगत, भाजपाचे कैलास दहातोंडे, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, दीपक जावळे अ‍ॅड. समीर शेख, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी व संचालक, व्यापारी, शेतमजूर, शेतकरी तसेच मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होते. काही काळ गावातील वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते. आता याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ऐन सणासुदीच्या काळात सर्वांनाच याचा फटका बसलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या