Thursday, April 25, 2024
Homeनाशिकग्रामीण भागात स्ट्रॉबेरीला वाढती मागणी

ग्रामीण भागात स्ट्रॉबेरीला वाढती मागणी

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी सप्तशृंगी गड, वणी-सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.

- Advertisement -

जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वरबरोबरच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथ्यावर लालमातीत पिकणारी लालभडक, लहान मोठी, आंबटगोड अशी स्ट्रॉबेरीची फळे वणी, सप्तशृंगी गड व सापुतारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली असून रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या भाविक व पर्यटकांना मोहीत करत आहे.

सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगाव, घागबारी, लिंगामा आदी भागात तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा आदी गावांतील आदिवासी शेतकरी शेतकरी भात, नागली, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, दादर, गहू या पारंपरिक पिकांसह आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग लावत आहे.

या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीची पोत यामुळे याभागात सात, आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागल्याने या भागात दिवसेंदिवस स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे.

विंटर, एसए कॅमेर ओझा, नादीला, आर 2, आर 1, तसेच स्वीट चार्ली आदी प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे वाण असले तरी या भागात सेल्वा, राणी, इंटर, नाभीया यांसह कमी दिवसात लालभडक मोठे फळ देणार्‍या स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या वाणांची रोपे येथील आदिवासी शेतकरी प्रामुख्याने महाबळेश्वर येथून 15 ते 25 रुपयांस एक रोप या दराने आणतात.

नगदी पीक असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या हातात थोड्याफार प्रमाणात पैसा खेळू लागला आहे. मोठे शेतकरी हे एक किलो, दोन किलोचे खोके भरून मुंबई, सूरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे पाठवले जातात. तर काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यावसायिकांना स्ट्रॉबेरीची विक्री करतात. बहुतांशी शेतकरी हे स्वत:च स्ट्रॉबेरी पाटी किंवा खोक्यात भरुन वणी, नांदुरी, सप्तशृंगी गड, सापुतारा रस्त्यांवरही ठिकठिकाणी छोटे-छोटे स्टॉल उभारून स्ट्रॉबेरी विकताना दिसत आहे. स्ट्रॉबेरी विक्रीतून अनेकांना यापासून रोजगार उपलब्ध झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या