शेतजमीनीची नापीकता चिंता वाढविणारी

jalgaon-digital
3 Min Read

माती नापिक होण्याची अनेक कारणे

माती नापिक होण्याची अनेक कारणे आहेत. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर तर होतोच. शिवाय मातीबरोबरच पाण्याचे परिक्षण देखील झाले पाहिजे. रासायनिक खतांमुळे जमीनीचा कस 9 पीएचवर गेल्यास ती नापिकीकडे वाटचाल करते. शेतकर्‍यांनी सेंद्रीय खतांचा वापर अधिकाधिक करण्याबरोबर शेतातील मातीचे सातत्याने परिक्षण संबंधित विभागाकडे केले पाहिजे. मातीतील नत्र, फॉस्फरस, सुक्ष्म अन्नद्रव्य यांच्यात कमतरतेबाबत माहिती मिळाल्यानंतर योग्य ती उपाययोजना करत पिके घेतली पाहिजे. सेंद्रीय खतांच्या मात्रा पिकांना फायदेशीर ठरत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. योग्य व्यवस्थापनाव्दारेच शेती फायदेशीर ठरते.

रमेशअण्णा कचवे, प्रयोगशील शेतकरी दहिदी, ता. मालेगाव

जमीनीला विश्रांतीची गरज

सतत परिश्रम-मेहनतीचे काम करत असलेल्या व्यक्तीवर ज्या पध्दतीने श्रमाचे परिणाम होतात तसेच शेतजमीनीचे देखील आहे. सतत घेतली जाणारी पिके व रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर यामुळे जमीनीचा पोत बिघडल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. वाढत्या उसशेतीमुळे क्षाराचे प्रमाण वाढून उत्पन्नात घट होतेे. रासायनिक खतांचा वापर टाळण्याबरोबरच उन्हाळ्यात जमीनीस विश्रांती देऊन सेंद्रीय खताव्दारे पिक घेतल्यास उत्पन्न निश्चितच वाढलेले दिसून येते. जमीनीचा पीएच तपासून घेण्याबरोबर शेणखताचा जास्तीत जास्त वापर केल्यास जमीन कसदार होण्यास मदत मिळते. पीक पद्धतीत सातत्याने बदल केल्यास मातीतील कस कमी होणार नाहीे.

कृषी भुषण अरूण देवरे, दाभाडी, ता. मालेगाव

मुलद्रव्य तपासूनच पिकांचे नियोजन व्हावे

शेतजमीनीत काय मुलद्रव्य आहे हे माती परिक्षणाव्दारे तपासूनच त्यावर उपाययोजना करीत पिके घेण्याचे नियोजन झाले पाहिजे. जमीन हलकी असेल तर तिचा कस काढू नये. माती नापिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सेंद्रीय खतांचा जास्तीतजास्त वापर करत तसेच जमीनीचे मुलद्रव्य तपासूनच पिक घेण्याचे नियोजन शेतकर्‍यांनी केल्यास त्यांचे नुकसान निश्चितच टळू शकणार आहे.

तात्याभाऊ भामरे, प्रयोगशील शेतकरी, अंबासन

आलटून पालटून पीके घ्यावीत!

रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर होत असल्यामुळे शेतजमीनीची सुपिकता कमी होत असल्याने उत्पादनात घट होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मातीबरोबरच पाण्याचे परिक्षण सातत्याने शेतकर्‍यांनी केले पाहिजे. या परिक्षणामुळे कुठला घटक कमीअधिक प्रमाणात आहे याची माहिती मिळून पिकाची लागवड करता येते. परिणामी उत्पादन वाढू शकते. एकच पिक सातत्याने घेणे देखील नुकसानदायक ठरत असल्याने आलटूनपालटून पिके घेतली पाहिजे. विशेष म्हणजे रासायनिक खतांऐवजी शेणखत, कंपोस्ट खतांचा वापर शेतकर्‍यांनी केल्यास शेतजमीनीची सुपिकता वाढू शकेल. मातीचा कस कमी होणार नाही.

नंदलाल शिरोळे, प्रयोगशील शेतकरी, वडेल, ता. मालेगाव

वार्षिक तणे नष्ट करावीत

जमीनीचा पोत बिघडल्यामुळेच शेती उत्पादन घटत आहे. माती सुपिक असण्याबरोबर पाण्याचा निचरा होणारी देखील असणे गरजेचे आहे. मातीचा पोत व तण रचना टिकवून ठेवायची असेल तर शेतकर्‍यांनी सेंद्रीय खतांचाच वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. बहुवार्षिक तणे देखील नष्ट करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शेतजमीन मोकळी ठेवल्यास याचा लाभ पिकांच्या पोषकतेबरोबर उत्पादन वाढीसाठी होतो. या संदर्भात वेळीच खबरदारी घेण्याची गरज प्रत्येक शेतकर्‍यास आहे.

नितीन कोर, प्रगतशील शेतकरी, अंबासन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *