Friday, April 26, 2024
Homeनगरगॅस दराच्या भडक्याने ग्रामीण भागात पुन्हा पेटू लागल्या चुली

गॅस दराच्या भडक्याने ग्रामीण भागात पुन्हा पेटू लागल्या चुली

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

सणासुदीच्या तोंडावर स्वयंपाकाच्या गॅस दरात होणार्‍या वाढीचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला असून महिलांवर सरपण गोळा करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस दरातील वाढ सर्वसामान्य जनतेला व महिलांना डोकेदुखी ठरत आहे. ‘उज्ज्वला’ योजनेअंतर्गत केंद्र सरकारने गॅस जोडण्यांचे वितरण केले असले तरी गॅस टाकी आणण्यासाठी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न सर्वसामान्य महिलांना पडला आहे. उज्ज्वला योजनेत सहभागी झालेल्या कुटुंंबातील रिकामी झालेली गॅस टाकी अनेक महिन्यांपासून घरातील कोपर्‍यात पडून असल्याचे व स्वयंपाक चुलीवर करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी स्टोव्हसाठी अथवा चूल पेटविण्यासाठी देखील रॉकेलचा सर्रास वापर व्हायचा पण आता रॉकेल देखील उपलब्ध नाही. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करणे गृहिणींसाठी मोठे त्रासदायक काम ठरत आहे.

गॅसची मुलभूत किंमत 495 रुपये, केंद्र सरकार कर 24 रुपये 75 पैसे, वाहतूक 10 रुपये, म्हणजे एकूण किंमत 529 रुपये 75पैसे, राज्य सरकार कर 291 रुपये 36 पैसे, राज्यातील ट्रान्सपोर्ट खर्च 15 रुपये, डिलर्स कमिशन 5 रुपये 50 पैसे, अनुदान 19 रुपये 57 पैसे या सर्व गोष्टी मिळून जवळपास एक गॅस सिलिंडरला 861 रुपये 18 पैसे ग्राहकांना मोजावे लागत आहे.त्यात ग्रामीण भागात तर प्रति गॅस सिलेंडरला 960रुपये मोजावे लागत आहे. परंतु यातही आता पंधरा रुपयाने वाढ झाली आहे. दरवाढीत दोन्ही सरकारे जबाबदार आहे असे सर्वसामान्य जनतेतून आवाज आता ऐकू येत आहे.

दिवाळी सणाच्या आधीच सरकार गॅस, पेट्रोल, डिझेलचे दरात रोजच्या रोज भाव वाढ करून दिवाळी आधीच महागाईचे फटाके फोडत आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे हैराण झाली असताना त्यात ही दरवाढ अजून डोकेदुखी ठरत आहे. सरकारने दरवाढीला ब्रेक लावावा.

– संदीप पाटील, पाचेगाव

एक वर्षापूर्वीपर्यंत गॅस टाकीवर अनुदान देण्यात येत होते. हे थोडेफार येणारे अनुदान बंद तर केलेच शिवाय दरही पूर्वीपेक्षा अधिक वाढवले जात आहेत. ऐन सणासुदीच्या काळात गॅस दरवाढीचा भडका करीत सर्वसामान्य माणसाच्या खिशाला अतिरिक्त बोजा करण्याचे काम हे सरकार करीत आहे.

– शशिकांत साळुंके, पाचेगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या