नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा या कारखान्याच्या संचालक मंडळाने गाळप हंगाम 2021-22 मधील उत्पादित झालेली साखर एमएसपीपेक्षा कमी भावाने विकलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आठ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.

14 फेबु्रवारी 2019 चे भारत सरकारचे राजपत्र उपभोक्ता मामले खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार 31 रुपये प्रति किलो पेक्षा कमी भावात कारखान्यास साखर विक्री करता येणार नाही, असे आदेश असून सुद्धा तो आदेश डावलून एमएसपीपेक्षा कमी भावात नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळांनी साखर विकलेली आहे. या कमी भावात विकलेल्या साखरेचा प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी अहवाल मागवला आहे.

याबाबत 10 ऑक्टोबरला कारखान्याचे सभासद संदीप नागवडे, भाऊसाहेब पवार, जितेंद्र मगर, सिद्धेश्‍वर नांद्रे, बाळासाहेब पवार, प्रशांत शिंदे, हौसराव परकाळे व इतर सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक साखर नगर यांच्याकडे सर्व संचालक मंडळाच्या चौकशीची मागणी केली होती आणि चौकशीतील दोषी संचालक मंडळावर कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करण्याचे सभासदांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना पत्र दिले होते. त्यानंतर संचालक मंडळाने एमएसपीपेक्षा कमी भावात साखर विकली आहे, त्याबाबतचा अहवाल प्रादेशिक सहसंचालक साखर नगर कार्यालयास विना विलंबाने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या अडचणी वाढल्या आहेत.

आम्हाला प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांच्याकडून अहवाल मिळाल्यानंतर एमएसपीपेक्षा कमी भावात साखर विकल्याने केंद्र शासनाकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती संदीप नागवडे यांनी दिली. तर नागवडे कारखाना संचालक मंडळाने केंद्र शासनाचा एमएसपीपेक्षा कमी भावात साखर विक्री करू नये, याबाबतचा आदेश डावलला आहे. यामुळे आम्ही आमच्या वकिलांचा सल्ला घेऊन गरज पडल्यास न्यायालयात जाणार असल्याची माहिती सभासद जितेंद्र मगर व भाऊसाहेब पवार यांनी दिली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *