गोंडेगाव शिवरस्ता उद्घाटन, काँग्रेस गाव पुढार्‍यांची गटबाजी उघड

jalgaon-digital
2 Min Read

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी तालुक्यातील गोंडेगाव येथील

काँग्रेसच्या गाव पुढार्‍यांकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजताच उद्घाटनाची परंपरा कायम राखली जाते.

स्व.जयंत ससाणे यांच्या विधानसभा सदस्यत्वाच्या कारकिर्दीपासून आ. भाऊसाहेब कांबळे व सध्याचे आमदार लहू कानडे तसेच जिल्हा परिषदेचे बाबा दिघे, सौ. आशाताई दिघे, सौ.संगीता पवार, तसेच विद्यमान जि. प. सदस्य, पं. स. सदस्य यांच्यामार्फत रस्ते कामासाठी निधी टाकला जातो. मात्र निवडणुका होताच पुन्हा रस्त्याची काम होत नाही आणि निधी कुठे जातो ते देखील समजत नाही.

असाच प्रकार पुन्हा एकदा घडण्याची तयारी सुरू झाली आहे. जानेवारीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत गावातील अनेक रस्त्यांच्या उद्घाटनाची शक्यताही नाकारता येत नाही. पुन्हा एकदा उद्घाटन केल्याने गावात लोकप्रतिनिधी तसेच स्था. स्व. संस्थेच्या प्रतिनिधी यांचे हसे होताना दिसत आहे.

गेल्या तीस वर्षांपासून गोंडेगाव मधील अनेक रस्त्यांची गाव पुढार्‍यांमार्फत लोकप्रतिनिधींकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींकडून हेळसांड केली जाते. गावातील ज्येष्ठांनी यापूर्वी अनेकदा उद्घाटन कार्यक्रमात या रस्त्यांना पोतेभर नारळ फोडल्याचे बोलूनही दाखवले आहे. दरम्यान याबाबत ताजे उदाहरण म्हणजे जुलैमध्ये उद्घाटन झालेला तसेच नगर जिल्ह्याचे आध्यात्मिक स्थान असलेल्या सराला बेटाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा गोंडेगाव-नायगाव रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण कामाचे उद्घाटन झाले होते.

ते काम अद्यापपर्यंत अपूर्ण अवस्थेत असताना पुन्हा नव्याने नव्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात गावपुढारी स्वतःला धन्य मानत आहे. दिवाळी-दसरा प्रमाणे पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे रस्त्यांच्या उद्घाटनाच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान मागील पंचवार्षिकमध्ये अकरा सदस्य संख्या असलेल्या गोंडेगाव ग्रामपंचायतीत केवळ दोन सदस्य निवडून आले ही बाब लक्षात घेऊन देखील हे गाव पुढारी उद्घाटन करण्यात धन्यता मानताना दिसत आहे. तरीदेखील त्यांना यश का मिळत नाही हा संशोधनाचा विषय आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *