Friday, April 26, 2024
Homeनाशिककोविड केअर सेंटरचे उद्घाटन

कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

नांदगाव।प्रतिनिधी

श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे श्री शनी संस्थानच्या भक्त निवासामध्ये करोना बाधीतांवर उपचारासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त उपचार केंद्र गुप्ता रूग्णालयाव्दारे सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

या रूग्णालयाचे उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष नारायण अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.अत्यंत अल्पदरात उपचाराबरोबर इतर सुविधा देखील रूग्णांना याठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असल्याने करोनाच्या साडेसातीपासून रूग्णांची श्री शनी महाराजांच्या सान्निध्यात निश्चित मुक्तता होईल, असा विश्वास संस्थानचे जनरल सेक्रेटरी माजी आ. अ‍ॅड. अनिल आहेर यांनी व्यक्त केला.

रूग्णालय उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सुहास कांदे हे होते. गुप्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. परितोष गुप्ता व त्यांचे पथक हे करोनाग्रस्तांवर उपचार करणार आहेत. नस्तनपूर येथे रूग्णालय निर्मितीमुळे बाधितांंना मिळणार्‍या सुविधेबद्दल आ. सुहास कांदे यांनी समाधान व्यक्त करत उपचार केंद्रासाठी जी मदत लागली ती केली आहे भविष्यात आवश्यकता भासल्यास मदत करू, अशी ग्वाही दिली.

करोना बाधिताचा लोक तिरस्कार करतांना दिसून येत आहे. मात्र अनिल आहेर यांनी असा कुठलाही विचार न करता निस्वार्थी भावनेने या ठिकाणी उपचार केंद्र सुरू केल्याबद्दल आ. कांदे यांनी कौतुक केले. कार्यक्रमास कृऊबा सभापती तेज कवडे, विलास आहेर, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, मजूर संघ संचालक गुलाब भाबड, संस्थानचे विश्वस्त खासेराव सुर्वे, उदय पवार, हारेश्वर सुर्वे, डॉ. शरद आहेर, भागवत वाबळे, भागवत भवर, नवनाथ बोरसे, शिवाजी बच्छाव, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या