Thursday, April 25, 2024
Homeनगरटाकळीमियात ग्रामस्थांनी चोराला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

टाकळीमियात ग्रामस्थांनी चोराला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

टाकळीमिया (वार्ताहर) / Taklimiya राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

येथील टाकळीमिया-देवळाली प्रवरा रस्त्याच्या कडेला रहात असलेल्या बाळासाहेब निमसे यांच्या वस्तीसह बर्‍याच वस्त्या आहेत. सोमवारी रात्री एक ते दीड वाजेदरम्यान बाळासाहेब निमसे यांच्या वस्तीवर कुत्रे भूंकू लागल्याने निमसे कुटुंबातील गणेश निमसे यांनी बाहेर चाहूल घेतली असता वस्तीवर कुणीतरी आहे, असे लक्षात आले.

- Advertisement -

त्यांनी घरातील लोकांना जागे केले व आसपासच्या वस्तीवरील शेजारच्या लोकांना फोन करून सांगितले. जवळच राहात असलेले शहाजी जाधव व त्यांची मुले वस्तीकडे येत असता त्यांना अनोळखी माणूस अंधारात दिसला. त्यांनी त्याला झडप घालून पकडले व निमसे यांच्या वस्तीवर आणले. तोपर्यंत इतर वस्तीवरील लोक जमा झाले. त्यांनी ताबडतोब राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गस्तीवर असलेली पोलीस व्हॅन दाखल झाली व त्या चोरट्यास पोलिसांच्या हवाली केले. परंतु हा एकटा चोरटा नसावा याचे दोन-तीन तरी साथीदार असावेत. मात्र, ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, असा संशय निमसे यांनी पोलिसांजवळ व्यक्त केला.

एक-दीड वर्षांपूर्वी बाळासाहेब निमसे यांच्या याच वस्तीवर चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील खोल्यांना कड्या घालून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. त्या चोरीचा अद्यापही तपास लागला नाही. तालुक्यासह टाकळीमिया भागातही चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यापूर्वीही गावात लहान मोठ्या चोर्‍या झालेल्या आहेत. त्यामुळे टाकळीमिया येथे पोलीस चौकीची मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या