राजकारणात कुणी कायमचा मित्र किंवा दुश्मन नसतो

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राजकारणात कुणी कायमचा मित्र किंवा दुश्मन नसतो. राजकारणात विचारांची लढाई असते. कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट होणे यात गैर काहीही नाही, असे मत शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावात एका कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले आहे.

काल मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाली होती. या विषयावर ना.गुलाबराव पाटील यांनी आपले मत मांडून गुगली टाकली.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी जळगावात रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना मुंबईत घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत विचारणा केली, त्यावर उत्तर देताना ना.पाटील बोलत होते.

ना.गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट होणे यात गैर काहीही नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली. त्यात काही राजकीय उद्देश नव्हता. सामना वृत्तपत्राच्या मुलाखतीबाबत चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते भेटले आहेत, हे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दोन्ही पक्ष वेगवेगळे असले, त्यांचे विचार वेगळेवेगळे असले तरी एक नेता दुसर्‍या नेत्याला भेटू शकतो. संजय राऊत हे वृत्तपत्राचे प्रमुख देखील आहेत. त्यांची काही चर्चा असू शकते. पण या चर्चेचे आपण वेगळे स्वरूप मांडावे, असे नाही.

नेते एकमेकांना भेटू शकत नाहीत का? यातून पुढे काहीही घडामोडी घडणार नाहीत. भाजप आणि शिवसेनेचा एकमेकांकडे ओढा वाढला की नाही, याबाबत मी मत मांडू शकत नाही.

तो ओढा तयार करण्याची जबाबदारी आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आहे. नेते जो आदेश करतील, तो आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असेही ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

राजकारणात कुणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो. राजकारणात विचारांची लढाई असते. आपण एखाद्या लग्नसमारंभात जातो, अंत्ययात्रेत जातो. अनेक कार्यक्रमांमध्येही जात असतो. तशाच प्रकारे फडणवीस आणि राऊत यांच्यात भेट झाली असावी, असेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतो, असे मत मांडून गुलाबराव पाटील यांनी उत्सुकता मात्र ताणून धरल्याचे बोलले जात आहे.

भाजपने खडसेंवर अन्याय केलाय

भाजपने काल केंद्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना डावलण्यात आले आहे. याबाबत पत्रकारांनी ना.गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हा विषय भाजपचा आहे. त्यावर बोलणे संयुक्तिक नाही. पण एकनाथराव खडसे हे आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर निश्चितच भाजपने अन्याय केला आहे, असेही ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात ओला दुष्काळाची मागणी – ना.पाटील

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याआधी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत देखील मूग, उडीद पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती.

आता कापसाचे नुकसान झाल्याने कालच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, केळी पीकविम्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. त्यावर नेमलेली उपसमिती काम करत आहे. केळी उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून पीक विम्याचे निकष पूर्वीचेच राहतील, याबाबत आम्ही आग्रही आहोत, असेही ना.गुलाबराव पाटील यावेळी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *