Friday, April 26, 2024
Homeनगरपिंपरी निर्मळमधील करोना परिस्थितीमध्ये सुधारणा

पिंपरी निर्मळमधील करोना परिस्थितीमध्ये सुधारणा

पिंपरी निर्मळ (वार्ताहर) – लॉकडाऊन व नियमांचे पालन केल्यामुळे राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावामध्ये करोना रुग्णसंख्येमध्ये घट येत आहे. गावात आज अखेर 167 करोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या गावातील पाच अ‍ॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

करोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जग वेठीस धरले गेले आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने दोन महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ मध्येही गेल्या दीड महिन्यापासून वाढणार्‍या करोना रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तरीही ग्रामस्थांनी बेसावध न राहता लॉकडाऊनच्या नियमांचे शिस्तीने पालन करण्याचे आवाहन आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष तथा सरपंच डॉ. मधुकर निर्मळ व उपसरपंच रमाकांत पवार यांनी केले आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत मध्यंतरी गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. आरोग्य विभाग, प्रशासकीय यंत्रणा व कडक लॉकडाऊनमुळे परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र ग्रामस्थांनी बेसावध न राहता शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे. पिंपरी निर्मळ गावची लोकसंख्या सहा हजारांच्या पुढे असून जवळपास एक हजार ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी 650 ग्रामस्थांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तसेच गावात सोमवारी रॅपीड अँटीजेन टेस्ट कॅम्पचे आयोजन केले असून त्यामध्ये भाजीपाला, किराणा व दूध डेअरी चालकांसह इतर व्यावसायिकांची करोना तपासणी होणार आहे.

– डॉ.मधुकर निर्मळ, सरपंच

- Advertisment -

ताज्या बातम्या