नादुरुस्त ई-पॉज मशिनमुळे रेशनवरील धान्य वाटपास विलंब होत असल्याची तक्रार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मे व जून महिन्यासाठी रेशनवर मोफत धान्य देण्यात येणार आहे. मे महिन्यासाठीचे धान्य रेशन दुकानदारांना वितरणासाठी मिळाले आहे, मात्र तालुक्यात 110 ई-पॉज मशिन असून त्यापैकी फक्त 40 मशिनच चालू असल्याने अन्य रेशन दुकानदारांना धान्य वितरण करण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारी रेशन कार्डधारकांनी केल्या आहेत.

करोना महामारीमुळे सामान्य जनतेला रेशनवर अन्न सुरक्षा कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मे महिन्यासाठी वाटण्यात येणारे धान्य रेशन दुकानदारांना मिळाले आहे. मात्र, बर्‍याच रेशन दुकानदारांकडील ई-पॉज मशिन खराब झाल्या आहेत. बॅटर्‍या चालत नाही, रेंज मिळत नाही, काही मशिनच चालू होत नाही. यामुळे रेशनचे धान्य वितरण करताना अडचणी येत असून अन्न सुरक्षा रेशन कार्डधारक व रेशन दुकानदारांमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत. ही बाब दर महिना नित्याचीच होवून बसली असल्याचे संतप्त कार्डधारक बोलून दाखवित आहेत.

ई-पॉज मशिन अनेक दिवसांच्या झाल्या असल्याने त्या खराब होत चालल्या आहेत. या मशिन बदलून देणे किंवा दुरुस्त करून देणे गरजेचे आहे. त्यांना नवीन बॅटर्‍या देण्यात आल्या पाहिजे. धान्य आले मात्र, रेशन दुकानदार का वाटत नाही, असा सवाल रेशन कार्डधारक करीत असल्याने ई-पॉज मशिनच्या काही अडचणी कार्ड धारकांना समजावून सांगता दुकानदार व कार्डधारकांमध्ये वाद होत आहेत. रमजन ईदचा सण जवळ आला आहे. अशा परिस्थितीत जनतेला धान्य मिळणे गरजेचे असून पुरवठा अधिकार्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी कार्डधारकांनी केली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *