Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मधील महत्वाचे मुद्दे

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात सहभागी झाले होते. आज ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 105 वा भाग होता. या कार्यक्रमात त्यांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरवण्यापासून ते G20 चे यश तसेच भारतीय तरुणांसाठी एक उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. G20 च्या प्रचंड यशानंतर हा पहिला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून कशाप्रकारे संदेश मिळत आहेत, याबाबत पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, चांद्रयान-3 च्या यशानंतर, G-20 च्या भव्य कार्यक्रमाने प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित केला. भारत मंडपम स्वतःच एखाद्या सेलिब्रिटीसारखा बनला आहे. लोक त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत आणि अभिमानाने पोस्ट देखील करत आहेत. आफ्रिकन युनियनला G-20 चे पूर्ण सदस्य बनवून भारताने या शिखर परिषदेत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे, असंही यावेळी पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले, दिल्लीमध्ये आणखी एक रोमांचक कार्यक्रम होणार आहे. जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम. या कार्यक्रमाद्वारे देशभरातील लाखो विद्यापीठांचे विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. यामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटी सारखी विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालये अनेक नामांकित संस्था देखील सहभागी होतील. मला आवडेल की तुम्ही जर महाविद्यालयीन विद्यार्थी असाल तर 26 सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम तुम्ही जरूर पहा. त्यात तुम्ही जरूर सहभागी व्हा.

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना जागतिक पर्यटन दिनाची आठवण करून दिली आहे. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले, 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे, काही लोक पर्यटनाकडे केवळ प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहतात. परंतु पर्यटनाचा एक फार मोठा पैलू रोजगाराशी निगडीत आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल, तर भारताची विविधता पाहण्याचा प्रयत्न करा. गेल्या काही वर्षांत भारताविषयीचे आकर्षण वाढले आहे आणि G-20 च्या यशस्वी संघटनेनंतर जगभरातील लोकांची भारताकडे उत्सुकता वाढली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

ज्या काळात भारत खूप संपन्न होता, त्या काळात आपल्या देशात आणि जगात सिल्क रूटची खूप चर्चा होते. हा रेशीम मार्ग व्यापार आणि व्यवसायाचे खूप मोठे माध्यम होते. आता आधुनिक काळात भारताने G-20 मध्ये आणखी एक आर्थिक कॉरिडॉर सुचवला आहे. हा भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. येत्या शेकडो वर्षांसाठी तो जागतिक व्यापाराचा आधार बनणार आहे आणि या कॉरिडॉरचा उगम भारतीय भूमीवर झाला हे इतिहास सदैव लक्षात ठेवेल. असंही मोदी यावेळी म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *