Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामोदींच्या आरोपांचा परिणाम

मोदींच्या आरोपांचा परिणाम

पुणे । प्रतिनिधी Pune

मोदींची धोरणे पसंत आहेत, तर मग गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याविरोधात का लढाई लढली गेली? त्याआधी निवडणुकीचे आमचे लक्ष्य मोदी होते. मोदींचे लक्ष्य आम्ही होतो. आता चार वर्षे काम केल्यानंतर आज अचानक असे काय परिवर्तन झाले? असे काहीही नाही. त्यांना तिकडे जायचे होते. त्यांना सत्तेची गरज होती. मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्याचा कदाचित परिणाम म्हणून हे सगळे घडत असावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडावर व्यक्त केली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत यांनी अजित पवारांसह त्यांना समर्थन देणार्‍या नेत्यांचा समाचार घेतला. शरद पवार म्हणाले, जे पक्षातून गेले ते विधानसभेचे सदस्य आहेत. ज्यांना ईडीफचे प्रॉब्लेम आहेत तेच गेले आहेत. ईडीच्या चौकशीमुळे आमच्यातील काही आमदार अस्वस्थ होते.

यात छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांची नावे आहेत. या सगळ्यांवर केलेल्या कारवायांमधून त्यांना कधी क्लीनचिट मिळतेय आणि या सगळ्यातील नेमके काय अंडरस्टँडिंग होते ते लोकांसमोर येईल, याची मी वाट बघत आहे, असे पवार म्हणाले. मुंबईत गेलेल्या काही लोकांनी मला फोन केला आणि आम्हाला इथे बोलवून आमच्या सह्या घेतल्या, पण आमची भूमिका वेगळी आहे. दोन-तीन दिवसांत भेटून भूमिका सांगू, असे सांगितल्याचे पवार म्हणाले. ज्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली, त्या सर्व नऊ जणांबाबत निर्णय घेणार असल्याचेही पवारांनी सांगितले.

जे कोणी गेले त्यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. जे गेले त्यांच्यातलेच काही लोक संपर्क साधत आहेत. त्यांना दोन गोष्टींची चिंता आहे. एक तर मतदारसंघ आणि दुसरे पक्षांतर्गत कार्यकर्त्यांशी व नेत्यांशी असलेले व्यक्तिगत संबंध. सत्तेचा काही लाभ त्यांना होईल, चार-दोन कामे होतील, निवडणुकीसाठीच्या सहाय्याबाबत ते चिंतामुक्त झाले असतील, पण या सगळ्या गोष्टी 100 टक्के यश देतात असे नव्हे. शेवटी लोक ठरवतात, लोकांचा पाठिंबा आवश्यक असतो. ती चिंता यातल्या अनेकांना असावी. म्हणून ते आमच्याशी संपर्क साधत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. बंडखोरीबाबतचे अधिक स्पष्ट चित्र माझ्याइतकेच जनतेच्या समोर मांडण्याची आवश्यकता आहे. बंडखोर आमदारांनी त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली तर त्याबद्दल माझा विश्वास बसेल. त्यांनी तशी भूमिका मांडली नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली, असा निष्कर्ष मी काढेन, असे ते म्हणाले.

पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्षाच्या भवितव्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल. मला हा नवीन नाही. 1980 मध्ये निवडणुकीच्या नंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्याचे 58 आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर सहा सोडले तर बाकी सगळे सोडून गेले होते. सगळे पक्ष सोडून गेले, मी विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी पाच लोकांचा नेता झालो. पाच लोकांनाबरोबर घेऊन मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी केली. त्यानंतर जी निवडणूक झाली त्यात आमची संख्या 69 वर गेली होती. त्यावेळी जे पक्ष सोडून गेले त्यापैकी पुढच्या निवडणुकीत 4 जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. 1980 ला जे चित्र दिसले तेच जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हे मी पाहतो आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे असंही शरद पवार म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर जे पक्षाच्या चौकटीबाहेर जाईल त्या प्रत्येकाच्या संबंधिचा निकाल घ्यावा लागेल. 9 लोकांचाही निकाल घ्यावा लागेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या धोरणाशी विसंगत पावले कोणी टाकली असली तर ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोक बसतील आणि त्यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. फक्त एकच आहे, हा निकाल एकटा व्यक्ती घेणं योग्य नाही. त्यामुळे बाकीचे सहकारी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, इतर सगळ्यांशी आम्हाला बोलणे करावी लागेल, असे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही, याची मला खात्री आहे. मी आयुष्यातील पहिली निवडणूक लढवली तेव्हा चिन्ह होते बैलजोडी. त्यानंतर काँग्रेस फुटल्यावर आमची खूण होती चरखा! त्यानंतर गाय-वासरु हे चिन्ह होते. चार चिन्हे घेऊन माझ्याच आयुष्यात मी निवडणुका लढलो. समोरचा माणूस कोण आहे हे लोक बघतात. त्याचे काम काय आहे ते पाहतात, असे पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे आभार

दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे असे म्हणाले होते. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याचबरोबर सिंचनासंदर्भात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सहभागी आहे, असा उल्लेख केला होता. मात्र मला आनंद आहे की, मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, अशा शब्दांत पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना चिमटा काढला.

- Advertisment -

ताज्या बातम्या