Friday, April 26, 2024
Homeनाशिकस्वतंत्र बँक शाखेसाठी अंमलबजावणी - कृषीमंत्री भुसे

स्वतंत्र बँक शाखेसाठी अंमलबजावणी – कृषीमंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon / Mungse

ग्रामीण भागातून कांदा ( Onion ) विक्रीसाठी येणार्‍या शेतकरी, वाहन चालक तसेच स्थानिक श्रमिक कामगारांना घरगुती जेवण तसेच शुध्द पाणी उपलब्ध करून देत कृउबा संचलित मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्र आशीर्वाद देणारे उपक्रम राबवत आहे. या केंद्रावर खरेदी-विक्रीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने येथे स्वतंत्र बँक शाखा ( Independent Bank Branch ) कार्यान्वित व्हावी यासाठी तातडीने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी येथे बोलतांना दिली.

- Advertisement -

कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रातील मुख्य प्रवेशव्दार, स्ट्रिट लाईट्स, बळीराजा शिवथाळी, पिण्याच्या शुध्द पाण्याचे आर.ओ. प्लॅन्टचा शुभारंभ कृषीमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सरपंच रंजना पिंपळे, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, संजय दुसाने, रामा मिस्तरी, वसंत कुवर, रामराव सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, अशोक देसले, राहूल पाटील, गोकुळ सुर्यवंशी यांच्यासह पंचक्रोषीतील शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. याठिकाणी स्वतंत्र बँक शाखा कार्यान्वित झाल्यास शेतकरी व व्यापार्‍यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे बँक सुरू व्हावी यासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन ना. भुसे यांनी यावेळी दिले.

कोकणातील पुरग्रस्तांसाठी कांदा व्यापार्‍यांनी 4 लाख रूपये किंमतीचा मोफत कांदा उपलब्ध करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. तसेच पंचक्रोषीतील शेतकरी बांधवांचा विश्वास संपादन करण्याबरोबर शेतकर्‍यांना सर्व मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून बाजार समिती अंतर्गत मुंगसे केंद्राने आज जे नावलौकीक मिळविल्याबद्दल संचालक मंडळाचे ना. भुसे यांनी कौतुक केले. शासनामार्फत आज शिवभोजन केंद्रातून राज्यातील सुमारे 25 लाख लाभार्थ्यांना मोफत भोजन दिले जात आहे. मात्र मुंगसे येथील केंद्रावर ना नफा, ना तोटा तत्वावर बळीराजासाठी शिवथाळीचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला जात आहे. या शिवथाळीच्या उपक्रमासाठी 1 लाखाची मदत देण्याची घोषणाही ना. भुसे यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती सुनील देवरे यांनी केले. पुरग्रस्तांसाठी व्यापार्‍यांनी चार लाखाचा कांदा गोणीमध्ये भरून दिला. तसेच दहा रूपयात पोटभर जेवण व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचे देवरे यांनी सांगितले. स्वच्छ व प्रतवारीचा माल पंचक्रोषीतील शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणल्यास त्यांना नक्कीच चांगला भाव मिळेल अशी भावना सभापती राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली. मुंगसे केंद्रावर येणार्‍या सर्व शेतकरी बांधवांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येत असून या केंद्राला उप बाजार समितीचा दर्जा मिळविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील असा विश्वासही सभापती जाधव यांनी व्यक्त केला.

यावेळी राहूल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव अशोक देसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास माजी सभापती काशिनाथ पवार, संचालक संग्राम बच्छाव, वसंत कोर, पुंजाराम धुमाळ, गोविंद खैरनार, विश्वनाथ निकम, अमोल शिंदे, गोरख पवार, सोसायटी चेअरमन श्रावण सूर्यवंशी, भरत पवार, प्रमोद पाटील यांच्यासह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या