Saturday, April 27, 2024
Homeनगरकरोना मुक्तीसाठी हिवरेबाजार पॅटर्न राबवा

करोना मुक्तीसाठी हिवरेबाजार पॅटर्न राबवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोना प्रादुर्भाव संपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढवली आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर काळजी घेतली जात असून प्रत्येक गावात आता हिवरे पॅटर्न राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत.

- Advertisement -

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी त्यांनी वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि त्याची तालुका व ग्रामपातळीवर होत असलेली अंमलबजावणी याबाबत संवाद साधला. यावेळी आदर्श गाव समितीचे अध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यावेळी म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या संकल्पनेवर आधारित माझे गाव माझी जबाबदारी आणि माझी सुरक्षितता माझी जबाबदारी या संकल्पना गावपातळीवर राबवाव्यात. कोविड प्रसार रोखण्यासाठी गावातील शंभर टक्के कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यासाठी गावातील स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि गावातील तरुण स्वयंसेवकाचा गट याची मदत घ्यावी. कोरोना प्रतिबंधक व उपचारासाठी गावात तरुण स्वयंसेवकांची पथके तयार करुन त्याद्वारे सर्वेक्षणापासून करोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही करावी.

लक्षणे दिसू लागताच तपासणीची वाट न पाहता तात्काळ अशा व्यक्तीस विलगीकरण कऱण्यात यावे आणि तपासणीअंती अशी व्यक्ती बाधित आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात अथवा रुग्णालयात दाखल करण्यात यावे. गावात एखाद्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्यास तात्काळ हेल्पलाईन 108 क्रमांकावर संपर्क करुन रुग्णवाहिका उपलब्ध करुन घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या