Thursday, April 25, 2024
Homeजळगावकोरोनात्तर काळातील हौशी रंगकर्मींची इम्युनिटी बुस्टर!

कोरोनात्तर काळातील हौशी रंगकर्मींची इम्युनिटी बुस्टर!

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य संचालनालयाने राज्यभरातील हौशी रंगकर्मींसाठी आयोजित केलेल्या 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीचा समारोप ‘फक्त चहा’ या युवा ब्रिगेडीयर्स जळगावने सादर केलेल्या नाट्यप्रयोगाने झाला. सोबतच हिरक महोत्सवी स्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीचे सूप वाजले.

कोरोनाच्या वैश्विक संकटाची झळ सर्वच क्षेत्रासोबतच नाट्यक्षेत्राला बसली. अनेक हौशी, व्यावसायीक रंगकर्मी, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टीस्टचे संसार उद्धवस्त झाले आहे. ऐतिहासिक परंपरा असलेली ही नाट्यस्पर्धा कोरोनाकाळात झालीच नाही. त्यामुळे राज्यभरातील हौशी रंगकर्मींचे डोळे या स्पर्धेकडेच लागले होते.

अखेर दोनदा स्थगित झालेली ही स्पर्धा दि. 21 फेब्रुवारी रोजी पासून राज्यभरातील 19 केंद्रांवर सुरु झाली आणि नाट्यधर्म खर्‍या अर्थाने निभावणार्‍या समस्त रंगकर्मींचा जीव भांड्यात पडला. कारण नाट्यकलेला श्वास मानणार्‍या आणि स्पर्धेच्या निमित्ताने स्वत:ला सिद्ध करु पाहणार्‍या तमाम नाट्यकर्मींसाठी ही स्पर्धा म्हणजेच एका अर्थाने दिवाळीनंतरची दिवाळीच आहे. नाट्य पंढरीच्या वारकर्‍यांसाठी या क्षेत्रात काही नवे रचनात्मक करण्याची आणि जमलेच तरं कलेतून करीयर करण्याची सुसंधीच आहे. अजूनही काही केंद्रांवर ही प्राथमिक फेरीची स्पर्धा सुरुच आहे.

- Advertisement -

जळगाव केंद्रावरील संपन्न झालेल्या प्राथमिक फेरीचा सकारात्मक दृष्टीने विचार करता अखंडपणे एकूण 15 नाट्यप्रयोगांचे सादरीकरण प्राथमिक फेरीत झाले. त्याचमध्ये भुसावळ, जळगव, इंन्दौर येथील नाटकांचा समावेश आहे. यंदा जिगरबाज हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी दर्दी नाट्यरसीकांनी मोठ्या संख्येने केलेली ‘गर्दी’ नक्कीच उल्लेखनीय होती. त्यामुळे नाट्यकर्मींना प्रोत्साहन देण्यासोबतच चांगल्यापैकी रसिक तयार करण्याचा उद्देश सफल झाला. आणि राजाश्रय मिळालेल्या स्पर्धेला खर्‍या अर्थाने नवसंजीवनी मिळाली. आणि रसिकाश्रय देखील प्राप्त झाला.

प्रतिकुल परिस्थितीत केलेल्या सांस्कृतीकदृष्ट्या महाराष्ट्राचा मानबिंदू ठरलेल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शासनाचा सांस्कृतीक विभाग, स्थानिक पातळीवरील समन्वयक समन्वयक रंगकर्मी दीपक पाटील व त्यांची टीम,समस्त रंगकर्मींचे तमाम रसिकजनांचे मनस्वी अभिनंदन.

थोडक्यात स्पर्धेचा ल.सा.वि काढायचा झाल्यास स्मस्त हौशी कलावंत, तंत्रज्ञ यांना त्यांच्या रंगसेवेला नवसंजीवनी देणारी आणि कोरोनानंतरच्या काळात बहुप्रतिशित असलेली ही स्पर्धा नाट्यचळवळीसाठी खर्‍या अर्थाने ‘इम्युनिटी बुस्टर’ ठरली हे अगदी निर्विवाद! यंदाच्या स्पर्धेत काही नाटके थेट भिडणारी होती तर काहींच्या सादरीकरणातील नाट्य समजून घ्यावे लागले. जुन्या जाणत्या रंगकर्मींसोबतचं काही हौशी नवोदित रंगकर्मी, तंत्रज्ञांनाही स्पर्धेत हजेरी लावली.

काहींनी स्पर्धेसाठी नवीन नाट्यसंहिता देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर काहींनी सृजनशीलतेचा परिचय देत नवे कॉमर्स वापरले. नवे तंत्रज्ञानही स्विकारुन तंत्रज्ञांनी हम भी कुछ कम नहीं असे दाखवून दिले. खरेतर स्पर्धेत उतरुन प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करुन नाटक खेळण्याची जिगर सामील झालेल्या रंगकर्मींनी दाखविले. काहींनी तर कोरोनाकाळात स्वत:चा पुर्नजन्म झाल्यानंतर देखील तसेच जिवलगांना गमविल्यानंतरही जिद्दीने दिग्दर्शन केले अभिनयही केला.

ऐवढेच नव्हे तर इतर स्पर्धक संस्थांना ‘नवे ते हवे’ आणि ‘कमी तिथे आम्ही’ अशा परोपकारी वृत्तीने मनोभावे सहकार्यही केले. खर तर नाट्यसंहिता लेखन, पात्र निवड, तंत्रज्ञानाकडून चोख काममिरी करवुन घेत आर्थिक गणित जमवून नाट्यसंचांचे व्यवस्थापन ते सादरीकरण ही प्रोसेस अजिबात सोपी नाहीये. परंतु तरीही हुरहून्नरी, मेहनती आणि गुणी रंगकर्मींनी हे आव्हान स्विकारत लेखन तंत्राचा, सादरीकरणातील काही उणिवा काही ऐनवेळी निर्माण झालेले तांत्रिक दोष यातून शिकत-सावरत ही मंडळी उर्जावान, निष्ठावान रंगसेवक मंडळी पुन्हा नव्या दमाने रंगसेवा करण्यासाठी सज्ज झालेली आहेत. सलाम आहे त्यांच्या जिद्दीला.

फक्त काही नम्र सुचना आहेत. स्पर्धेमुळे नाट्यचळवळीसाठी चांगल्यापैकी पुरकपोषक वातावरण निर्मिती झालेली आहे. यंदा काही कारणास्वत 15 नाट्यसंस्थांनची सामीलकी असली तरी अमळनेर, चाळीसगाव, जामनेर इथल्या हौशी रंगकर्मींनी देखील पुढल्या वर्षी स्पर्धेत आपला सहभाग द्यायला हवा. शासनाने पुर्वीप्रमाणे शास्त्रीय धडे देण्यासाठी नाट्यशिक्षण, प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करायला हवे. तसेच नाट्यकलेतून करियर घडविता यावे यासाठी सर्व पातळ्यांवर प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरु प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांनी जाणीवपूर्वक विद्यापीठात अगोदर पासून सुरु असलेले ललित कला विषयक अभ्यासक्रम करीयर घडविणारे कसे होतील ते पहावे.

याशिवाय काही प्रमाणात दुर्लक्षीत राहिलेली बालरंगभूमी, संगित रंगभूमी पुन्हा नव्या क्षमतेने व उर्जेने कार्यान्वियत व्हायला हवी. महाविद्यालयीन रंगभूमी सुद्धा मोठे योगदान या कामी देत आहेत. युवारंग युवक महोत्सव, उमवी करंडक, ठिकठिकाणची ऑनलाईन, ऑफलाईन स्नेहसंमेलने म्हणजे खरतर नाट्यकलेची संधी आणि शिक्षण देणारी पाठशाळा आहे. त्यातील सहभाग वाढायला हवा. यंदाच्या हिरक महोत्सवी स्पर्धेने अनेक उर्जावान नवलेखक, प्रयोगशील दिग्दर्शक, गुणी अभिनेते, अभिनेत्री दिल्या आहेत.

त्यातील यशस्वी निवडक नाटकांचे व्यावसायीक प्रयोग व्हायलाही हरकत नाही. त्यासाठी काही व्यावसायीक प्रतिष्ठाने, वर्तमानपत्रांनी माध्यमप्रायोजकत्व स्विकारुन अशा गरजू, गुणी नाट्यकर्मींना आर्थीक हातभार लावला पाहिजे. म्हणजेच स्पर्धेमुळे नाट्यस्पर्धेत निर्माण झालेला उत्साह, पोषक-पुरक वातावरणाचा सकारात्मक उपयोग करवून घेतल्यासारखे होईल. आता प्राथमिक फेरीसाठी शासन नियुक्त तज्ञ परिक्षकांचा औपचारीक निकाल लवकरच जाहीर होईल.

काही जाणत्या रसिकांनी समाज माध्यमातून स्पर्धेविषयी अंदाज व्यक्त केले आहे. सर्वच जिगरबार रंगकर्मींचा सहभाग महत्वाचा, निकाल लागायचा तो यथावकाश लागेल परंतु सर्वांनीच हौशी रंगभूमी सांस्कृतीक दृष्ट्या अधिकाधिक वर्धिष्णू, सामर्थ्यवान होण्यासाठी सज्ज व्हावे. आपापले योगदान द्यावे हीच अपेक्षा!

- Advertisment -

ताज्या बातम्या