Friday, April 26, 2024
Homeनाशिकगुन्हेगारांवर तत्काळ कारवाई हवी : भुजबळ; महिला भरोसा सेल, शरणपूर पोलीस चौकीचे...

गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई हवी : भुजबळ; महिला भरोसा सेल, शरणपूर पोलीस चौकीचे उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असली तरी सामन्य नागरिकांवर अन्याय होत असेल तर पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत सराईतांवर, दोषींवर ताबडतोब कारवाई करावी, अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महिला भरोसा सेल तसेच शरणपूर येथील पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ बोलत होते. त्यांच्या हस्ते फीत कापूर दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन झाले. यावेळी पोलीस दलाला मदत करणार्‍या संस्था, व्यक्ती तसेच उत्कृष्ट काम करणार्‍या निर्भया पथक, महिला कक्षाच्या अधिकारी, सेवकांचा सत्कार भुजबळांच्या हस्ते झाला.

- Advertisement -

भुजबळ म्हणाले, दरी मातोरी येथील डीजे प्रकरणात युवकांना सराईत गुन्हेगारांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांनी याची दखल घेतली नाही, असे नागरिकांनी आरोप केले आहेत. असा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी उपायोजना कराव्यात. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये वातावरण बिघडत आहे. पोलिसांनी नागरिकांशी मित्रत्वाच्या भावनेने वागले पाहिजे. पोलिसांना कोणतेही सण आपल्या कुटुंबासमवेत साजरे करता येत नाहीत, हे कधीतरी आपणही लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक नागरिकामध्ये एक पोलीस दडलेला आहे. तो कायम जागृत ठेवल्यास गुन्हेगारी रोखण्यात फार मोठी मदत पोलिसांना होईल, असे आवाहन त्यांनी केले.

आज समाजात लहान-लहान गोष्टींवरून कुटुंबे तुटत आहेत. ती तुटू नयेत यासाठी पूर्वी गावागावांत पंच कमिटी काम करायची. ते आता संपले आहे. यामुळे या कमिटीचे काम अशा भरोसा सेलद्वारे पोलिसांना करावे लागत आहे. यास इतर विभागांची चांगली मदत नक्की मिळेल. शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने मागणी केलेल्या पोलीस चौक्यांच्या नूतनीकरणासाठी तसेच वाहनांसाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी)च्या निधीतून तर पोलीस स्टेशन व पोलीस निवासांसाठी राज्याच्या निधीतीतून तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आ. देवयानी फरांदे म्हणाल्या, पहिला भरोसा सेल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये सुरू झाला. यानंतर तो नाशिक येथे सुरू होण्यसाठी आपण पाठपुरावा केला. याद्वारे महिलांना एका छताखाली 11 विभाग विविध मदत करणार आहेत. अगामी काळात केंद्र शासनाचा सखी कक्ष सुरू व्हावा यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.

पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाचे सादरीकरण केले. तसेच नवीन पोलीस ठाण्यांसाठी जागा तसेच निधी, पोलीस चौक्यांची निर्मिती तसेच निर्भया पथकांसाठी चार वाहनांची आवश्यकता असल्याचे सांगत निधी मिळण्याची मागणी केली.

याप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मण पाटील, विजय खरात, पौर्णिमा चौघुले, माजी मंत्री शोभा बच्छाव, गुरमित बग्गा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

आता आमच्यावर भरोसा ठेवा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भरोसा सेलची सुरुवात सर्वप्रथम नागपुरात झाली. हा उपक्रम नागपूरप्रमाणे नाशिकमध्येहीे वृद्धिंगत व्हावा, असे आ. फरांदे यांनी आपल्या भाषणात म्हटलेे. आपल्या भाषणाची सुरुवात करताना भुजबळ यांनी हा धागा पकडून, नागपूरमध्ये भरोसा सेल सुरू झाला होता, आता आमच्यावर भरोसा ठेवा, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. प्रत्येक शासन आपली धोरणे, नवे उपक्रम राबवत असते असे सांगत भुजबळांनी आ. फरांदेंचे बोलणे खोडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या