Thursday, April 25, 2024
Homeनगरतिळापूर शिवारात आणखी आठ जनावरे दगावली

तिळापूर शिवारात आणखी आठ जनावरे दगावली

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील तिळापूर शिवारामध्ये एका विशिष्ट आजाराने गेल्या आठ दिवसांत सुमारे 35 गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असताना काल पुन्हा 4 गायी व 4 बोकड या आजाराने दगावले. ह्या गंभीर आजाराची मालिका सुरुच असल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक दाखल झाले आहे.

- Advertisement -

डॉ. अमर माने, डॉ. एस.एस.पालवे, डॉ. विजय धिमते, डॉ. एन.एस. मेहत्रे, डॉ.एस.ऐ.निकम, डॉ. डि. बी.निमसे, डॉ. अविनाश ठाकूर यांच्या टिमने प्रत्यक्षात आजावर निदान करीत आहेत व शेतकर्‍यांना योग्य त्या खबरदारीच्या सुचना केल्या जात आहेत.

तिळापूर शिवारात गेल्या आठ दिवसांपासून अनेक शेतकर्‍यांच्या गायी मृत्यूमुखी पडण्याची घटना घडत आहेत.तर अनेकांच्या गायी ह्या गंभीर आजारी पडल्या आहेत. तर येथील शेतकरी गोविंद बाचकर 3 गायी, 4 बोकड, संदीप काकड यांची 1 गाय दगावली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गंभीर समस्येची पशुवैद्यकीय विभागाकडून तात्काळ दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा तसेच अनेकांच्या आजारी जनावरांना औषधोपचारासाठी व दगावलेल्या जनावरांना शासन स्तरावर योग्य ती मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

शेतकर्‍यांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. शासन स्तरावर वैद्यकीय विभाग काळजी घेत आहे. आजाराचे कारण कळू शकलेले नसून यापूर्वीच वैद्यकीय विभागाने परिसरामध्ये लसीकरण केले असते तर आज एवढी मोठी समस्या निर्माण झाली नसती.

– अजित पवार, शेतकरी.

तिळापूर शिवारामध्ये गायींचे मृत्यू होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पशुवैद्यकीय टीमचे प्रत्यक्षात काम सुरू आहे. परीसरातील संपूर्ण जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे. प्राथमिक लक्षणानुसार लाळ्या खुरकूत असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या गायींचे शवविच्छेदन करून नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण पूर्ण करावे, तसेच असा प्रकार कुठे घडल्यास शेतकर्‍यांनी घाबरून न जाता तात्काळ पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा.

– डॉ.अमर माने, पशुवैद्यकीय अधिकारी पंचायत समिती, राहुरी

तिळापूरमध्ये अनेक गायी दगावल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पशुवैद्यकीय टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा देऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना घटनेविषयी माहिती देणार आहे.

– रविंद्र आढाव, सदस्य पंचायत समिती राहुरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या