Friday, April 26, 2024
Homeनगरबेकायदेशिर विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या ट्रकसह 'एवढ्या' लाखाचा मुद्देमाल जप्त

बेकायदेशिर विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या ट्रकसह ‘एवढ्या’ लाखाचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |प्रतिनिधी|Sangmner

गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असणार्‍या विदेशी मद्याची महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असतांना तिची वाहतूक करणारा

- Advertisement -

मालट्रक मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगावपावसा शिवारात पकडला. सुमारे 86 लाख 47 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अहमदनगर व पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या केली.

गोवा राज्यात निर्मित झालेली विदेशी मद्याचा एक मालट्रक हा विदेशी मद्य घेवून पुणे-नाशिक महामार्गाने जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधिक्षक संजय सराफ, संगमनेरचे निरीक्षक आर. डी. वाजे, निरीक्षक बिराजदार, पुणे दुय्यम निरीक्षक एन. सी. परते, विकास थोरात, नगर दुय्यम निरीक्षक ए. ई. तातळे यांच्या पथकाने हिवरावपावसा येथे सापळा रचला.

पुणे-नाशिक महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर पथकाने मालट्रक अडविला. दहा टायर टाटा कंपनीचा 2518 (क्रमांक एमपी 09, एच. जी. 6876 हा ट्रक पथकाने पकडला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असणार्‍या तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असणार्‍या विदेशी मद्य आढळून आले.

त्यामध्ये रॉयल चॅलेंज व्हीस्कीच्या 750 मी. ली. क्षमतेच्या 7137 सिलबंद बाटल्या, आरबेला व्होडकाच्या 750 मी.ली. क्षमतेच्या 297 सिलबंद बाटल्या, आरबेला व्होडकाच्या 180 मी.ली. क्षमतेच्या 1104 सिलबंद बाटल्या, किंगफिशर स्ट्राँग बियर 500 मी.ली. झमतेच्या 552 सिलबंद टीन, एक इंटेक्स कंपनीचा मोबाईल, इतर साहित्य असा एकूण 86 लाख 47 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात भारतसिंग बापुलाल प्रजापती (वय 32, रा. गादियामेर, दोलाज, ता. खिलचीपुर, जि. राजगड, राज्य मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. अधिक तपास अधीक्षक गणेश पाटील हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या