Sunday, May 5, 2024
Homeनगरकोपरगावातील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त

कोपरगावातील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून कायद्याचे उल्लंघन होत आहे. याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या इशार्‍यावरून प्रशासनाने दाखल घेत नगरपरिषद व शहर पोलिसांनी एकत्र कारवाई करत शनिवारी सकाळी 11 वाजता संजयनगर भागातील अतिक्रमण चोख पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आलेे. त्यामुळे अवैध गोवंश कत्तल करणार्‍यांना चाप बसण्यास सुरुवात होणार आहे .

- Advertisement -

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गोवंश हत्या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे .तर हा व्यवसाय थेट घरातून चालवला जात असल्याची गंभीर दखल घेत नगरपरिषदेने या बाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संबधित खाटकांना कोपरगाव शहर पोलिसांनी नगरपरिषदेस दि . 26 ऑक्टोबर रोजी संजयनगर, सुभाषनगर, आयशा कॉलनी, बैलबाजार रोड येथील अवैध कत्तल खान्याच्या बांधकामाबाबत कळवले असून त्या नुसार अवैध बांधकामे तात्काळ काढून घेण्याचे फर्मान काढले होते. न काढल्यास नगरपरिषद याबाबत कायदेशीर कारवाई करील अशी सक्त ताकीद मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली होती.

याबाबत गेल्या महिन्याभरापासून कोपरगाव शहरातील हिंदू संघटना (Hindu organization) गोवंश हत्या बंदी समिती यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शनिवारी(३०) सकाळी साडे दहा पावणेअकराच्या सुमारास नगरपालिका (Kopergoan nagar palika) मुख्याधिकारी शांताराम गोसावी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेने शहर पोलीस, कमांडो पथक नगरपालिका विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी जेसीपी अशा सर्व ताफ्यासह ही जोरदार कारवाई करून या भागातील आठ ते दहा कत्तलखाने उद्ध्वस्त केले.

मात्र तरी त्याची दखल या मुजोर गोवंश कत्तलखाने चालविणार्‍या असामाजिक तत्त्वांनी घेतली नव्हती. अखेर कोपरगाव शहर पोलिसांना नगरपरिषदेने मदतीला घेण्याचा व या अवैध कट्टलखान्यांचा बिमोड करण्याचा निर्धार केला. त्याची अंमलबजावणी आज प्रत्यक्ष मुख्याधिकारी शांताराम गोसावी व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या उपस्थितीसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, भरत नागरे आदींसह 05 अधिकारी व 40 ते 50 कोपरगाव शहर, तालुका पोलीस, शिर्डी पोलीस कर्मचारी असे विविध सशस्त्र पोलीस व नगरपरिषदेचे विविध विभागाचे विभागप्रमुखांसह 15 अधिकारी व 125 आरोग्य तर अन्य 110 स्वच्छता विभागाचे कर्मचारी यात 30 महिला कर्मचारी उपस्थित होते. दोन जेसीबी, 4 ट्रॅक्टर, 2 डंपर, 8 आपे मालवाहू रिक्षा, 2 अग्निशामक गाड्या व त्यांचे दल पोलीस गाड्या आदींचा या मोहिमेत समावेश आहे .

तीन वर्षांपूर्वी तर ऐन शिवरात्रीच्या दिवशी लाखो रुपयांचे गोवंश नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी धाड टाकून पकडून दिले होते. त्या नंतर वारंवार गोदावरी नदी कोपरगावात होणार्‍या गोवंशाच्या कत्तलीचा रक्ताचा महापूर येत असून त्याचा नदीकाठच्या हिंदू देवतावर रक्ताभिषेक होत आहे. मात्र शहर पोलीस व नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करत असल्याचे आरोप विविध हिंदू संघटना व त्यांच्या पदाधिकार्‍यांनी वारंवार केला होता. त्या निषेधार्थ कोपरगाव नगरपरिषद, तहसील कार्यालय, बाजार समिती, पोलीस ठाणे यावर कोपरगाव तालुका गोरक्षा समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून प्रशासनाचा जोरदार निषेध केला होता.

यावर निर्णय घेण्यासाठी 31 ऑक्टोबरची अंतिम मुदत ठरवून दिली होती. मात्र तरीही मोठ्या शेडमधील कत्तल थांबली असली तरी आता या व्यवसायातील कसाई व व्यापार्‍यांनी आता थेट आपल्या घरातच कत्तलखाने बनवून त्या गोवंशाच्या रक्ताचे पाट थेट गोदावरी नदीत काढून दिले होते. त्यामुळे हे मुजोर खाटीक पोलीस आणि नगरपरिषद यांना जुमानत नसल्याने नगरपरिषद व पोलिस प्रशासन संतापले होते .त्या नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

कोपरगावात गो हत्या खपून घेतली जाणार नाही. म्हैस वर्गीय प्राणी यांची कत्तल करण्यासाठी त्यांना स्वाटर हाऊस व कसाई खाना बांधून दिलेला असून ही कत्तल तिथेच करावी. मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली अनाधिकृतपणे चालणारे कत्तलखाने नेस्तनाबूत करण्यात आलेले आहे. गोसावी यांनी अत्यंत संयमाने कौशल्याने सदरची परिस्थिती हाताळून गो हत्या करणार्‍या विरोधात सक्रिय असणार्‍या संघटनांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या माध्यमातून बर्‍याच वर्षातून नगरपालिकेला एक चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितच ते व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी कौतुकास पात्र आहे. भविष्यात अशीच शहरातील वाढलेली अतिक्रमणां विरुद्ध ठोस मोहीम मुख्याधिकारी गोसावी हाती घेतील अशी कोपरगाव मधील सामान्य जनतेच्या अपेक्षा आहे.

– विजय वहाडणे, नगराध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या