विनामास्क बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍यांवर कोणतीही कारवाई नाही

jalgaon-digital
2 Min Read

सोनई |वार्ताहर| Sonai

बेकायदा प्रवाशी वाहनांमधून प्रवास करणारे कुठलेही सोशल अंतर न पाळता दाटीवाटीने मास्क न लावता प्रवास करत असल्याचे

चित्र नेवासा तालुक्यात दिसत असून वाहतूक पोलीस ‘मंथली’साठी या वाहनधारकावर कुठलीही कारवाई करीत नसल्याचे भयानक वास्तव आता पुढे येऊ लागलेले आहे मात्र रस्त्यावर प्रवास करणार्‍या खासगी वाहन धारकांना मास्क बाबतचे दंड व कारवाया केल्या जात आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सध्या नेवासा तालुक्यात करोना संसर्ग वाढत असून सोनई व घोडेगाव येथे परवा 7 व 5 असे संक्रमित आढळले दररोज सोनई घोडेगावात करोना रुग्ण आढळत आहेत मात्र जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व प्रशासनाकडून कडक आदेश असतानाही केवळ स्थानिक वाहतूक पोलीस मात्र बेकायदा प्रवाशी वाहतूक वाहनांमधील विना मास्क प्रवाशांवर कारवाई करीत नसल्याने स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे

सोनई पोलीस ठाण्याचे अखत्यारीत घोडेगाव येथे बीट हवालदार, पोलूस कर्मचारी व वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्याऐवजी वाहतूक पोलीस वेगळ्याच कामात गर्क असल्याचे सांगण्यात येते मात्र स्वतःचे खाजगी वाहनाने प्रवास करणार्‍या बाहेरगावाहून आलेल्या वाहनांना त्रास देऊन कधी पावती फाडणे तर कधी विना पावती दंड केला जात असल्याची माहिती असून वरिष्ठांनी याकडे लक्ष घालून घोडेगाव चौफुला येथे कार्यक्षम पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.

घोडेगावची पोलीस चौकी शोभेची वास्तू

सोनई पोलीस ठाण्याने घोडेगाव येथे आऊटपोस्ट मंजूर करून तेथे बीट हवालदार व पोलीस कर्मचारी नेमले. घोडेगाव ग्रामपंचायतने या आऊटपोस्टसाठी नगर औरंगाबाद राजमार्गालगत मोक्याची जागा बांधून दिली परंतु घोडेगावला नेमणुकीस असलेले कुठलेही बीट कर्मचारी घोडेगावात वास्तव्यास राहत नसल्याचे समजले असून ही पोलीस चौकी फक्त शोभेची वस्तू बनली आहे.

नवीन अधिकार्‍यांमुळे कर्मचार्‍यांची मनमानी

सध्या गेल्या 4 महिन्यांपासून सोनई पोलीस ठाण्याचे प्रभारीपदी नवीन सहाय्यक निरीक्षक आलेले आहेत, शेवगाव उपविभागाचे उपअधीक्षक सुद्धा नवीन आलेले आहेत मात्र या नवीन अधिकार्‍यांची फक्त हांजी हांजी करून बीट मधील पोलीस कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत मनमानी करीत असल्याचे चित्र असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी खालच्या पातळीवर काम करणारे पोलिसांची कार्यक्षमता तपासून पाहावी अशी मागणी होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *