Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील अवैध सावकारीचा पर्दाफाश

जिल्ह्यातील अवैध सावकारीचा पर्दाफाश

जळगाव । Jalgaon

कर्जापोटी शेतजमिनी (Agricultural land on loan) ताब्यात घेणार्‍या रावेर आणि यावल तालुक्यातील आठ सावकारांनी संगनमताने केलेल्या अवैध सावकारीचा सहकार विभागाच्या माध्यमातून पर्दाफाश करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी राज्यातील सर्वात मोठी कारवाई करून अवैध सावकारांना जोरदार चपराक दिली आहे. तसेच कर्जापोटी केलेले खरेदीखत रद्द करण्याची घोषणा करून जिल्हा उपनिबंधक बिडवई यांच्यामुळे संघर्ष करणार्‍या 15 शेतकरी आणि त्यांच्या वारसांना हक्काची जवळपास 38 हेक्टर 37.588 आर अशी जवळपास 100 एकर शेतजमीन परत मिळाली आहे. दरम्यान राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली असल्याने अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावेर आणि यावल तालुक्यातील विविध गावातील 15 शेतकर्‍यांनी कर्जापोटी जवळपास 100 एकर जमीनीचे आठ सावकारांना खरेदीखत करून दिले होते. रकमा परत करूनही शेतजमीन ताब्यात मिळत नसल्याने या शेतकर्‍यांनी सहकार विभागासह पोलीस, मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र तरी देखिल त्यांना न्याय मिळत नव्हता. अखेर या सर्व शेतकर्‍यांनी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी कार्यवाहीला सुरूवात केली.

आठ ठिकाणी टाकल्या होत्या धाडी

शेतकर्‍यांच्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशीसाठी आठ पथके तयार केली होती. या आठ पथकांनी दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशिराम राणे, सुदाम तुकाराम राणे, मधुकर तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी, मुरलीधर सुदाम राणे (सर्व रा. सावदा ता. रावेर)अशा आठ जणांकडे धाडी टाकल्या. या धाडीत शेतजमिनी खरेदीखताचे काही दस्तेवज आढळून आले होते. या कारवाईनंतर जिल्हा उपनिबंधकांनी याबाबत सखोल चौकशी सुरू केली.

47 सुनावण्या अन् 324 दस्तांची तपासणी

जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता दि. 3 जानेवारी 2019 पासून सुनावण्यांना सुरूवात केली. अर्जदार शेतकरी विरूध्द अवैध सावकारी करणारे आठ जण अशांमध्ये तब्बल 47 वेळा सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान नंदकुमार मुकुंदा पाटील यांचे 54, मुरलीधर तोताराम भोळे यांचे 37, मुरलीधर काशिराम राणे 66, सुदाम तुकाराम राणे 21, श्रीधर गोपाळ पाटील 18, मधुकर वामन चौधरी 9, मुरलीधर सुदाम राणे 65, अशा एकूण 324 दस्तेवजांची तपासणी करण्यात आली. यात या सर्व दस्तेवजांमध्ये अवैध सावकारी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

अशी होती मोडस ऑपरेंडी

या प्रकरणात नंदकुमार मुकुंदा पाटील हा म्होरक्या असून त्याने शेतकर्‍यांकडून घेतलेली जमिन इतर आणि नातेवाईकांच्या नावे घेतली जात होती. या सर्व शेतजमिनीचे मोठ्या रकमांचे व्यवहार हे रोखीने करण्यात येत होते. त्यामुळे या व्यवहारांची कुठेही नोंद मिळत नव्हती. तसेच मागेल तेव्हा संबंधीताला विशिष्ट रक्कम दिली जात होती. या प्रकरणात 2002-2003 या वर्षातील 20 लाखांचे दोन बॉण्डही वापरण्यात आले होते. अशी मोडस ऑपरेंडी वापरत नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशिराम राणे, सुदाम तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी, मुरलीधर सुदाम राणे यांनी संगनमताने अवैध सावकारी केल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले.

सहाय्यक निबंधकांचा अहवाल ठरला महत्वाचा

सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक विजयसिंग गवळी यांनी याबाबत अधिकचा तपास करून जिल्हा उपनिबंधकांना अहवाल दिला. हा अहवालच सात सावकारांभोवती फास आवळणारा ठरला. सहाय्यक निबंधक मंगेश शहा, शशीकांत साळवी आणि अरविंद गावित यांनी कागद पत्रांची जुळवाजुळव केली. तसेच सहायक निबंधकांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली.

आठ साक्षीदार अन् 117 पानी आदेश

रावेर तालुक्यातील 15 शेतकर्‍यांच्या अवैध सावकारी प्रकरणात वेळोवेळी घेण्यात आलेल्या सुनावणीच्या प्रक्रियेत आठ साक्षीदारांची तपासणी आणि उलटतपासणी करण्यात आली. शेतकर्‍यांच्यावतीने अ‍ॅड. गजानन बोचे यांनी प्रत्येक सुनावणी जोरदार युक्तीवाद केला. तब्बल तीन वर्ष घेण्यात आलेल्या या सुनावणीच्या प्रक्रियेनंतर बुधवारी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी 117 पानांचा आदेश काढून अवैध सावकारांच्या पाशात अडकलेली शेतकर्‍यांची 100 एकर जमीन मुक्त करून ती शेतकरी आणि त्यांच्या वारसांना परत केली.

या शेतकर्‍यांना मिळाली हक्काची जमिन

पुंडलिक नथ्थु चौधरी (रा. उदळी खु.ता. रावेर क्षेत्र- 2 हे. 39 आर), रमेश भास्कर पाटील (रा. हंबर्डी ता. यावल, क्षेत्र 6 हे. 49 आर), रमेश लक्ष्मण चौधरी आणि नीलेश रमेश चौधरी (रा. अट्रावल ता. यावल, क्षेत्र 3 हे. 42 आर), सुरेशचंद्र पाव्हणू फेगडे, चंद्रकुमार सुरेश फेगडे (रा. उदळी खु. ता. रावेर, 1 हे 89 आर), नीलेश धनसिंग पाटील (रा. दुसखेडा ता. यावल, 4 हे. 35 आर), रतिराम देवचंद पाटील (मयत रा. कोचुर ता. रावेर, क्षेत्र 1 हे. 74 आर), सुनील अर्जुन जावळे (रा. कुसुंबे ता. रावेर, क्षेत्र 0 हे. 97 आर), मंदाबाई मनोहर पाटील (मयत-रा. कुंभारखेडा ता. रावेर, क्षेत्र – 2 हे 40 आर), उषाबाई टोपा जंगले (रा. कुंभारखेडा ता. रावेर, क्षेत्र 4 हे. 81 आर), भारती अनिल परदेशी (रा. कोचुर बु. ता. रावेर, क्षेत्र 0.72आर), लक्ष्मण बुधो ढिवर (सुरळके) (रा.उदळी बु. ता. रावेर, क्षेत्र 1 हे. 39 आर), सोपान शामराव पाटील (रा. उदळी बु. ता. रावेर, क्षेत्र 0.84 आर), ज्ञानदेव देवराम महाजन (रा.उदळी खु. ता. रावेर, क्षेत्र 3 हे. 63.5 आर), श्रीकृष्ण दामु पाटील (रा. उदळी बु. ता. रावेर, क्षेत्र 0.84 आर), रवींद्र भागवत जावळे (रा. फैजपूर ता. यावल, क्षेत्र 2 हे. 49.088 आर आणि 158.63 चौ.मी. प्लॉट) अशा 15 शेतकर्‍यांना त्यांची हक्काची जमिन आज परत देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या