अवैध दारू दुकाने बंद करून ग्रामरक्षक दलाची स्थापना करा

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी गावातील अवैध दारू दुकानांविरोधात

पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून काल ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यात येऊन दारू कायमची बंद करा तसेच ग्रामरक्षक दलाची स्थापना करा, अशी मागणी करण्यात आली. यापूर्वी पाचेगावात अनेकदा या प्रश्नावरून लोकभावना तीव्र झाल्या होत्या. आंदोलने झाली होती. त्याची पुन्हा एकदा तयारी सुरू झाली.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून नऊ ते दहा दारूची अवैध दुकाने ग्रामपंचायत कार्यालयाच्या अत्यंत जवळच सुरू आहेत. आजपर्यंत गावात अनेक महिलांनी स्वतःला या दारूपाई संपवून घेतले. अनेक तरुणांच्या बायका पतीच्या दारुच्या व्यसनामुळे नांदत नाहीत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.

गावात अश्लील आणि अर्वाच्य भाषेत नेहमीच ऐकू येणारी शिवीगाळ आणि ग्रामस्थांना तसेच महिलांना होणारा त्रास या गोष्टींमुळे गावात दूषित झालेलं वातावरण. या सर्व गोष्टींना पाचेगावकर चांगलेच वैतागले आहेत. हा सर्व प्रकार चालतोच कसा ? यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामाबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिले व या अवैध दारुविरुद्ध रणशिंग फुंकले. ही दारू कायमस्वरूपीची बंद व्हावी यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करा, अशीही मागणी यात केली आहे. अवैध दारूविक्री तात्काळ बंद न झाल्यास व लवकरात लवकर ग्रामरक्षक दल स्थापन न झाल्यास, मंत्रालयासमोर आझाद मैदानात उपोषण पुकारू असाही इशारा सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळी दिला आहे.

दारू विक्रीवर लोकसहभागातून आळा घालण्यासाठी सरकारने ग्रामरक्षक दलाची स्थापना केली. त्यासाठी आता महाराष्ट्र दारूबंदी (सुधारणा) अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.त्याअनुषंगाने गावात ग्रामसुरक्षक दल स्थापन करण्यात यावे.

तसेच ही दारूविक्री अशीच चालू राहिल्यास सदरच्या सर्व दारूविक्रेत्यांना जिल्हाबंदी (तडीपार) करावी यासाठीची सुद्धा मागणी करणार आहोत असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन उपसरपंच श्रीकांत पवार यांना देण्यात आले. निवेदनावर चिलीया तुवर, बाबुराव तुवर, सर्जेराव तुवर, रविंद्र देठे, सुनील राक्षे आदी कार्यकर्तेच्या सह्या आहे.

22 मार्च 2017 च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र ग्रामरक्षक दल नियम 2017 अहमदनगर जिल्ह्याच्या क्षेत्रात लागू करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1311 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्याची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी या नियमात सुधारणा करणे गरजेचे होते. अखेर सरकारने त्या दिशेने पाऊल उचललं आहे. ग्रामरक्षक दलाच्या सदस्य अवैध आणि बेकायदेशीर दारू संबंधी माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा पोलीस अधिकार्‍यांना देतील. ग्रामरक्षक दलाने अवैध मद्य निर्मिती आणि विक्री बाबत कळवल्यास 12 तासांत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.