Wednesday, May 8, 2024
Homeनगरसावेडीतील अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर छापा

सावेडीतील अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रिक्षांमध्ये अनाधिकृतपणे घरगुती गॅस भरणार्‍या रिफलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. सहा गॅस टाक्यांसह रिफलिंगची मशिनरी असा 23 हजार 800 रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. नगर-मनमाड रोडवरील जय आनंद हॉटेलच्या पाठीमागे शुक्रवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

या प्रकरणी पोलीस अंमलदार संदीप गिर्‍हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिध्दांत शरद भिंगारदिवे (वय 21), जयंत छगन भिंगारदिवे (वय 38, दोघे रा. सावेडी गाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, नगर-मनमाड महामार्गावर जय आनंद हॉटेलच्या मागील बाजुला अनाधिकृत गॅस रिफलिंग सेंटर चालविले जात आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला छापा टाकण्याचा आदेश दिला. या पथकाने शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजता छापा टाकला.

या ठिकाणी सिध्दांत भिंगारदिवे व जयंत भिंगारदिवे हे गॅस रिफलिंग सेंटर चालवित असल्याचे आढळून आले. हिंदुस्थान पेट्रोलियम (एच.पी.) कंपनीच्या घरगुती वापराच्या सहा गॅस टाक्या आढळून आल्या. यातील काही टाक्या अर्धा भरलेल्या होत्या. रिक्षात हा गॅस भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार आढळून आली. गॅस टाक्या आणि इलेक्ट्रीक मोटार असा 23 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, अंमलदार सचिन जगताप, संदीप धामणे, गिर्‍हे, उपअधीक्षक कार्यालयातील अंमलदार सचिन जाधव, बाबासाहेब फसले, संतोष ओव्हळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या