Wednesday, April 24, 2024
Homeनगर... तर संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी जबाबदार

… तर संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी जबाबदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणार्‍या अवैध बायोडिझेल विक्रीचे रॅकेट समोर आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाणे हद्दीत अवैध बायोडिझेल विक्री होत नसल्याचे पत्र पोलीस अधिक्षकांना सादर करावे, अशा सूचना दिल्या आहेत. जर एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध बायोडिझेल विक्री होत असेल आणि विशेष पथकाने छापा टाकला तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांवर जबाबदारी राहील, असा इशाराही अधीक्षक पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

नगर शहराजवळ केडगाव, नगर तालुक्यातील वाटेफळ तसेच संगमनेर तालुक्यात अवैध बायोडिझेल विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलीस व पुरवठा विभागाने कारवाई केली. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या छाप्यानंतर पोलीस तपासात राजकीय पुढार्‍यांच्या समावेश आढळून आला. या प्रकरणात सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

बायोडिझेलच्या माध्यमातून कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अवैध बायोडिझेल विक्रीवर कडक निर्बंध घालण्याचा सूचना सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिक्षकांना बायोडिझेल विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अधीक्षक पाटील यांनी सर्व पोलीस निरीक्षकांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सातपुते पसारच

केडगाव बायपासवरील अवैध बायोडिझेल विक्रीमध्ये शिवसेनेचा शहर प्रमुख दिलीप सातपुते याचे नाव समोर आले आहे. कोतवाली पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात आरोपी केले आहे. तो पसार झाल्याने त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अद्याप त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सातपुतेसह 12 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या गुन्ह्यात अटक केलेल्या 10 आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या