Friday, April 26, 2024
Homeनाशिककळवण : मानुर कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड

कळवण : मानुर कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड

पुनदखोरे । Punadkhore

करोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन कळवण तालुक्यातील मानूर कोविड सेंटर मध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत . मात्र मानुर कोविड सेंटर मध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत असे की , कळवण शहरातील रामनगर परीसरातील राहणारे आत्माराम जगताप यांना (दि. १३) एप्रिल रोजी श्वास घेण्याचा त्रास जाणविल्याने त्यांनी प्रथमतः खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. त्रास जास्त वाढल्याने त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांना मानुर कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी त्यांची कुठलीही तपासणी अथवा स्वॅब न घेता इतर उपचार सुरु ठेवले. पंरतू (दि .१५) एप्रिल रोजी त्यांना जास्त प्रमाणात त्रास जाणविल्याने त्यांचा सकाळी १० वाजता मृत्यू झाला. या दरम्यान त्यांच्या जवळ कोणीही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. मयत जगताप यांचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी कोविड सेंटर मध्ये हजर झाले. त्यांनी कर्मचारींना मृत्यू देहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले, पंरतु संबधित कर्मचाऱ्याने मृत्यूदेहास हात लावण्यास साफ नकार दिला.

साधारण सकाळी १० वाजेपासुन ते दुपारी ३ .३० वाजेपर्यंत मृत्यूदेह त्याच परीस्थितीत पडून होता . कोविड सेंटर मध्ये मृत्यूदेह ५ ते ६ तास पडून असुन सुध्दा वैद्यकीय अधिकारी कींवा कर्मचारींने लक्ष दिले नाही. उलट मृत्यूदेहाच्या नातेवाईकांना मृत्यूदेह इथून लवकर हलवून तुम्ही स्वखर्चाने पि.पि. ई. कीट घेऊन या असे सांगीतले.

मृत्यूदेहास कोणी हात लावत नाही म्हणून नातेवाईकांनी बाहेरील मेडीकल मधून २५०० रुपयांचे पि.पि .ई . कीट आणून ते स्वतः परीधान करून मृत्यूदेहाला साध्या प्लास्टीक मध्ये गुंडाळून मृत्यूदेहाला स्वतः उचलून रुग्णवाहीकेमध्ये टाकुन त्यांच्यावर कळवण येथे अंत्यसंस्कार केले . या दरम्यान कोणीही आरोग्य विभागातला कर्मचारी, अधिकारी हजर नसल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

याबाबत मयताच्या नातेवाईकांना विचारले असता त्यांनी सांगीतले की, आमच्या रूग्णांला तीन दिवसांपासून फक्त ०.२ (ऑक्सीजन) वर ठेवले होते . त्यांचे स्वॅब घेण्यासाठी सुद्धा कोणी कर्मचारी आला नाही. त्याचप्रमाणे तीन ते चार दिवसांपासून एक रुग्ण उपचारासाठी येत असुन बेड शिल्लक नसल्याने बाहेरच उघड्यावर पडून आहे.

तसेच रुग्णांवर योग्य उपचार नाही, स्वच्छतागृहांमध्ये तुडूंब भरलेले दुर्गधींचे पाणी, दुर्गधीमुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले असुन प्रशासनाकडून देखरेखीच्या नावाखाली अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे सांगुन दाखविले.

दरम्यान मानुर कोविड सेंटर मध्ये केवळ ३२ बेड उपलब्ध असल्याने आजमितीस ४३६ रुग्ण उपचार घेत आहेत. बेडच्या कमतरतेमुळे तसेच आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

मानूर कोविड सेंटर मध्ये रुग्णांची हेळसांड केली जात असून कर्मचारी प्रतिसाद देत नाही. आम्हाला पाच ते सहा तासानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. संबधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

– बापू गरूड, नातेवाईक

- Advertisment -

ताज्या बातम्या