Thursday, April 25, 2024
Homeनगरआयडीबीआय बँक फसवणूक प्रकरणी तलाठी सहआरोपी

आयडीबीआय बँक फसवणूक प्रकरणी तलाठी सहआरोपी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda

बनावट कागदपत्रे देऊन आयडीबीआय बँकेची 25 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन तलाठी अतुल सीताराम धांडे याला बनावट सातबारा सह कागदपत्रात फेरफार प्रकरणी सह आरोपी करण्यात आले आहे. धांडे याला अटक करून न्यायालयात हजर केले असताना 25 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

बँक व्यवस्थापक अजय पोपट दानवे यांच्या फिर्यादीवरून पिसोरे बुद्रुक मधील सात जणांवर गुन्हे दाखल असताना याच प्रकरणात आता आठवा आरोपी म्हणून तलाठ्यास अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी यातील अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत या दोघांना तत्काळ अटक केली होती. त्यांच्या तपासातून पिसोरे बु. येथील तत्कालीन कामगार तलाठी अतुल सीताराम धांडे याचे नाव समोर आले असून त्याने संशयितांच्या नावावर जमीन नसताना शासकीय कागदपत्रात फेरफार करत संगनमताने बनावट शेतीचे सातबारा उतारे, फेरफार तयार करून दिल्याचे समोर आले आहे.

धांडे याच्या शोधाकरिता पोलिस पथक पाठवले मात्र मागील 12 जुलै पासून अतुल धांडे कामावर नसल्याचे सांगण्यात आले. अखेर आकोले तालुक्यातील राजूर येथील गावाकडे गेल्याची खबर मिळाली असता पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तो तेथूनही गायब असल्याने मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने अहमदनगर येथे सापळा रचून श्रीगोंदा पोलीसांनी त्यास अटक केली. त्याला श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने धांडे याला 25 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अटक आरोपींची संख्या तीन झाली असून तपासात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या