Friday, April 26, 2024
Homeराजकीयबंद रिसॉर्टमध्ये मनी लॉन्ड्रिंग कसे?

बंद रिसॉर्टमध्ये मनी लॉन्ड्रिंग कसे?

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

दापोलीतील साई रिसॉर्ट ( Sai Resort in Dapoli) प्रकरणात ईडीच्या (ED )अधिकार्‍यांनी माझी तेरा तास चौकशी केली. हे रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही आणि अजून सुरूही झाले नाहीतर त्यात मनी लॉन्ड्रिंग झालेच कसे? असा सवाल करत परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab) यांनी गुरुवारी ईडीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह लावले. आपण चौकशीला सहकार्य केले असून यापुढेही करीत राहू, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अनिल परब यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवास्थानी तब्बल तेरा तास कसून चौकशी केली. या चौकशीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, माझे शासकीय निवासस्थान आणि जिथे राहतो तसेच माझ्याशी संबंधित लोकांवर छापे घातले आहेत.

मागील काही दिवसांपासून सतत बातम्या येत होत्या की माझ्यावर ईडीची कारवाई होणार. दापोली येथील साई रिसॉर्टवरून ही चौकशी झाली. या रिसॉर्टचे मालक सदानंद कदम हे आहेत. त्यांनी त्याचा मालकी हक्क न्यायालयात सांगितला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचे हिशेबही दिलेले आहेत. हे सगळे असताना ही चौकशी का?

हे रिसॉर्ट अजूनही चालू झालेले नाही, पूर्ण झालेले नाही, असे असताना पर्यावरणाची दोन कलमे लावून सांडपाणी समुद्रात जाते असा गुन्हा दापोली पोलीस ठाण्यात नोंदविला गेला. जे रिसॉर्ट चालूच नाही तर समुद्रात सांडपाणी जाईलच कसे? प्रदूषण महामंडळ, प्रांत आणि पोलिसांनी तसा अहवाल दिला असताना माझ्या नावाने तक्रार दाखल करून नोटीस काढली गेली. त्या तक्रारीला गुन्हा समजून छापेमारी करण्यात आली, असे परब यांनी सांगितले.

ईडीच्या अधिकार्‍यांना त्यांनी विचारलेल्या सर्व प्रकारच्या प्रश्नांनाआपण उत्तरे दिली. मी आधीही सांगितले आहे की जी यंत्रणा जे प्रश्न विचारेल त्याला उत्तर द्यायला मी बांधील आहे. आजदेखील उत्तरे दिली आहेत. यापुढेही प्रश्न विचारले तरी उत्तरे देण्याची तयारी आहे, असेही परब म्हणाले. तसेच माझ्या सोबत ज्यांच्यावर छापे पडले त्यांचा तरी या रिसॉर्टशी काय संबंध? अशी विचारणा परब यांनी केली.

मुद्रात जर सांडपाणी जाईल म्हणून तक्रार करण्यात आली असेल आणि रिसॉर्टच बंद आहे तर यामध्ये मनीलाँडरींगचा विषय आला कुठे? या सर्वाचा खुलासा चौकशीअंती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांना ही कारवाई राजकीय सुडभावनेने केली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, मी कायद्याला समोर ठेवून प्रत्येक गोष्ट बघतो, कायदान्वये काय होऊ शकते हे पहातो. त्यामागचा काय अर्थ काढायचे हे वेळ आल्यावर बघू, असे त्यांनी सांगितले.

परब यांना तुरुंगाची हवा खावी लागणार : सोमय्या
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर, बोगस कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे, असेही सोमय्या म्हणाले.

शिवसैनिकांकडून निषेध…
ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांच्या वांद्रे पूर्व येथील निवासस्थानी छापे टाकल्याची माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक तिथे पोहोचले. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा तसेच भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या. संध्याकाळच्या सुमाराच ईडीचे अधिकारी त्यांचे काम संपवून गाडीने बाहेर जायला निघाले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीला घेराव घालत निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांच्या गाडीला वाट करून दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या