गावात संविधानाचे पारायण तर घराघरांत धार्मिक ग्रंथांचे वाचन !

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

नेहमीच आगळ्यावेगळ्या उपक्रम कार्यासाठी प्रसिध्द असणार्‍या नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये करोनाचे रुग्ण नसले तरी सोशल मीडिया, प्रसार माध्यमांतील बातम्या वाचून ग्रामस्थांच्या मनात दहशतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांच्या मनातील ही दहशत दूर करण्यासाठी आणि विशेष म्हणजे लोकांना घरातच गुंतवून ठेवण्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून एक वेगळा उपक्रम आजपासून गावात राबविण्यात येणार आहे. यात दररोज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक अंतर पाळून दररोज एक तास संविधानाचे पारायण होणार आहे तर प्रत्येक नागरिक घरात दिवसातून तीन वेळा आपापल्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करणार आहेत.

राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष व हिवरे बाजारचे सरपंच तथा पद्मश्री पोपटराव पवार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. सध्या सर्वत्र करोनाचे संकट आहे. सोशल मीडिया, विविध माध्यमे यावर फक्त करोनाचीच चर्चा आहे. हिवरेबाजार गावात करोनाचे रुग्ण नसले तरी गावात केवळ याच विषयावर चर्चा होती. ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण होते. या वातावरणातून गावकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी त्याचे मनोबल वाढविण्यासाठी वेगळा उपक्रम राबविण्याचा विचार होता.

या उपक्रमला आजपासून सुरूवात करत असल्याचे पवार यांनी सांगितले. यात गावात ग्रामपंचायती समोर दररोज एक तास भारतीय संविधानाचे वाचन होणार आहे. यावेळी करोनाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून दररोज 25 ते 30 ग्रामस्थ वाचन ऐकण्यासाठी उपस्थित राहतील. याशिवाय जे घरी राहणार आहेत. त्यांनी घरात तीन वेळा आपापल्या धार्मिक ग्रंथांचे पारायण करायचे आहे.

यामध्ये विशेषतः साईचरित्र, ज्ञानेश्वरी गाथा, गुरुचरित्र, हनुमान चालीसा, रामरक्षा, ग्रामगीता, नवनाथगाथा, कुराण, बायबल, बौध्दतत्त्वज्ञान यांचे पारायण होणार आहे. यातून मनोबल वाढण्याचा प्रयत्न होणार असून ताणतणाव दूर होऊन आनंद मिळेल व कुटुंबातील स्नेहभाव वाढेल. मुख्य म्हणजे निष्कारण बाहेर फिरणेही कमी होईल.

चार महिन्यांपासून करोनाच्या नियमांचे अतिशय काटेकोर पालन हिवरे बाजार ग्रामस्थांनी केले. त्यामुळे आजपर्यंत एकही करोना बाधित रुग्ण आढळला नाही. सध्या करोनाने जगभर थैमान घातले बातम्या पाहून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात सुद्धा झपाट्याने सुरू झाला आहे.

त्यातून बाहेर पडण्यासाठी हिवरे बाजार येथे या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण असते. अनेक गावांत सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. अनेक घरांत महिनाभर धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते. याच पद्धतीचा वापर करोनासंबंधीच्या उपाययोजनांसाठी करण्यात येणार असल्याचे पवार यांनी ‘सार्वमत’ शी बोलताना सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *