Friday, April 26, 2024
Homeनाशिकऐतिहासिक रामशेजचे अस्तित्व धोक्यात..!

ऐतिहासिक रामशेजचे अस्तित्व धोक्यात..!

जानोरी / ओझे

किल्ले अजिंक्य रामशेजवर शनिवारी, रविवारी हजारो पर्यटकांची गर्दी असते.

- Advertisement -

या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला बघण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने किल्ल्यावर काही टवाळ व उपद्रवीकडून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुना धोका निर्माण होत आहे.

किल्ल्यावर टवाळांचा कायमच असणारा हैदोस थांबवावा याबाबत रामशेजवरील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी तातडीने उपाय योजावे अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे व पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती आळे, आशेवाडी ग्रामपंचायत कार्यालय यांना देण्यात आले आहे.

किल्ले रामशेज नाशिकपासून अवघा १२ किलोमीटरवर पेठरोड लगत हा दुर्ग आहे. अवघ्या ३३० मावळ्यांनी ६ वर्षे रामशेजला वेढा देऊन बसलेल्या हजारो मुघली फौजेची दाणादाण उडवून रामशेज अजिंक्य राखला होता. याच पराक्रमाचे प्रतीक असलेला दुर्ग रामशेज अत्यंत महत्वाचा मूर्तिमंत वारसा आहे. त्याला जीवापाड जपण्यासाठी व त्याचे अस्तित्व वाचवण्यासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या अनेक वर्षे रामशेजवर अखंड दुर्गसंवर्धन श्रमदान मोहिमा घेत आहेत.

शिवकार्य गडकोटच्या माध्यमातून रामशेजवर अनेकवेळा स्वच्छता मोहीम, १८ जलाशयांचे पूर्ण संवर्धन, पर्यटकांसाठी भक्कम असे दिशादर्शक फलक ही लावण्यात आले आहे. तसेच दुर्गजागृती अभियान, रामशेज महोत्सव, छत्रपती शंभू राजे जयंती असे सततचे उपक्रम व संवर्धन करण्याचे काम केले जात आहे.

परंतु किल्ल्यावरील दिवसागणिक वाढती गर्दी बघता सुरक्षित पर्यटन व्हावे यासाठी अधिकृत गाईड, पर्यटन पोलीस नसल्याने पर्यटकांना टवाळ मंडळींकडून त्रास होतो. तसेच या टवाळखोरांकडून किल्ल्याची नासधूस होत आहे.

हे थांबवण्यासाठी रामशेजवर कायमचा वनपाल नेमावा, किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंदणीसाठी वन विभागाने पायथ्याला चौकी उभारावी अश्या अनेक मागण्या शिवकार्य गडकोटचे वतीने देण्यात आल्या आहेत.

ऐतिहासिक वारसा असलेले किल्ले वाचविणे गरजेचे असून किल्ल्याची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– मनोहर मोरे देशमुख, ग्रामस्थ

रामशेज येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभाग व पर्यटन विभागाकडून उपाय योजना करण्यात यावी. या ठिकाणी अनेक अपघात होत असल्याने तात्काळ सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा.

– समाधान पाटील, पर्यटक

- Advertisment -

ताज्या बातम्या