आंदोलनाचा इशारा देताच ‘गायत्री’कडून ग्रामपंचायतची थकबाकी व रस्त्यांची दुरुस्तीची हमी

jalgaon-digital
1 Min Read

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अवजड वाहनाच्या वाहतुकीने परिसरातील रस्ते खराब झाले आहे. मागणी करूनही या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास कंपनी टाळाटाळ करत होती. ग्रामपंचायत करापोटी असलेली थकबाकी कंपनीने थकवली होती. केशवराव होन यांनी या कंपनीचे गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा देताच कंपनीचे अधिकारी नरमले व त्यांनी दोन दिवसात या परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्यात येईल, असे सांगत ग्रामपंचायतची थकबाकी रक्कमही जमा केली जाईल, असे आश्वासन दिले.

माजी सरपंच केशवराव होन यांच्याकडे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी या कंपनीच्या कामामुळे रस्त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली तसेच रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने कसे चालवावी असा प्रश्न निर्माण झाला. अनेकांचे या खड्ड्यामुळे अपघातही झाले आहेत असे निदर्शनास आणून दिले.

सरपंच पूनम खरात, उपसरपंच विजय होन, ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर यांनी ग्रामपंचायतची थकबाकी देखील भरण्यास गायत्री कंपनी टाळाटाळ करत असल्याचे सांगितले. केशवराव होन यांनी गायत्री कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिकार्‍यांना याबाबत जाब विचारला. यावेळी येत्या दोन दिवसात या रस्त्यांचे काम पूर्ण करून ग्रामपंचायतीची थकबाकी देऊ असे कंपनीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *