Saturday, April 27, 2024
Homeनगरहिंदू जन आक्रोश मोर्चाला प्रतिसाद

हिंदू जन आक्रोश मोर्चाला प्रतिसाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चाला संघटनांनी मोठा प्रतिसाद दिला. मोर्चात कालीपुत्र कालीचरण महाराज व काजल दीदी हिंदुस्तानी सहभागी झाले होते. शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. दिल्लीगेट वेशीबाहेर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. दरम्यान, या मोर्चासाठी सुरक्षा यंत्रणेने तगडा बंदोबस्त लावला होता.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून या मोर्चाची जय्यत तयारी सुरू होती. काही संघटनांनी विरोध केल्याने मोर्चा चर्चेत होता. दुपारी बारा वाजता माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरूवात झाली. मोर्चा मार्केट यार्ड चौकात आल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून माळीवाडा वेशीतील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास अभिवादन केले. तेथून पांचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिकचौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार रोड, तेलीखुंट, चितळे रोड,नेता सुभाष चौकातून चौपाटी कारंजावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दिल्लीगेट वेशीबाहेर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.

मोर्चात विविध हिंदूत्वादी संघटनांसह शिवसेना, भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते. सुमारे 15 हजार नागरिकांची उपस्थिती होती. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवा झेंडा नागरिक सहभागी झाले होते.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने आधीच शहरातील 41 समाजकंटकांना तीन दिवसांसाठी हद्दपार केले. शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सुमारे 500 अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क होती. कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 41 समाजकंटकांना 13 ते 15 डिसेंबर या तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या