Saturday, April 27, 2024
Homeनगरहेरंब कुलकर्णींवर हल्ल्यासाठी 10 हजारांची सुपारी

हेरंब कुलकर्णींवर हल्ल्यासाठी 10 हजारांची सुपारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक व येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अक्षय विष्णू सब्बन याने पसार असलेल्या सनी जगधने याला 10 हजार रुपयांची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. अक्षय पोलिसांच्या ताब्यात असून जगधनेसह त्याचा पंटर पसार आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना अटक केल्यानंतर या गुन्ह्यासंदर्भात आणखी उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्ती केली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री अटक केलेल्या अक्षय सब्बन व चैतन्य सुनील सुडके यांना न्यायालयाने दोन दिवसांची (12 ऑक्टोबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

- Advertisement -

साहित्यिक कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (दि. 7) दुपारी साडे बाराच्या सुमारास सावेडीतील प्रेमदान हाडको परिसरात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत असलेले सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांनाही मारहाण झाली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांनी शनिवारीच गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी याकडे तब्बल दोन दिवस दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी कुलकर्णी यांच्या घरी भेट दिल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली.

अधीक्षक राकेश ओला यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासांतच हल्लेखोरांचा शोध घेऊन तिघांना नगर शहरातून ताब्यात घेतले. अक्षय विष्णू सब्बन (वय 30 रा. दातरंगे मळा), चैतन्य सुनील सुडके (वय 19 रा. बालिकाश्रम रस्ता) व एक अल्पवयीन मुलगा यांचा त्यामध्ये सहभाग आहे. एलसीबी पथकाने नगर शहरातील कोंड्यामामा चौक परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करून मारहाण करणार्‍यांना पकडले व तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यातील दोघांना अटक करून मंगळवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले. तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी न्यायालयासमोर पोलीस कोठडीची मागणी करताना गुन्ह्यातील पसार दोघांचा शोध घ्यायचा आहे, गुन्ह्याचा उद्देश शोधायचा आहे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रॉड जप्त करायचा असल्याचे सांगितले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

त्याने पुन्हा बसविले बस्तान

महापालिकेने सब्बन याची 40 वर्षांपासूनची गुटख्याची टपरी काढली असली तरी त्याने पुन्हा विद्यालय पासून 100 मीटर अंतरावरच आपल्या धंद्याचे बस्तान बसविले आहे. त्याने एका गाळ्यात आपला धंदा सुरू केला असून त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

आता माघार नाही

मारहाण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हेरंब कुलकर्णी यांना फोन आला. त्यांनी रूग्णालयासाठी झालेला खर्च देतो, असे कुलकर्णी यांना सांगितले. परंतू कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलताना, रूग्णालयाचा खर्च नको, जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय परिसरापासून 100 मीटरवर असलेल्या अवैध धंद्यांच्या टपर्‍या हटवा, कायदा आहेच तर त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला द्या, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात काही झाले तरी मी पाठपुरावा सोडणार नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

असा रचला कट

अक्षय सब्बन याची सुमारे 40 वर्षांपासून सीताराम सारडा विद्यालय परिसरात पानटपरी होती. हेरंब कुलकर्णी यांची जूलैमध्ये सीताराम सारडा विद्यालयात बदली झाली. त्यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार हाती घेताच विद्यालय परिसरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या अतिक्रमणातील टपर्‍या काढण्याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. जूलैच्या शेवटी मनपाने त्या सर्व टपर्‍या हटविल्या. 40 वर्षांपासून असलेली टपरी काढल्याचा राग सब्बन याच्या मनात होता. त्याने त्याच्या टपरीवर नेहमी येणार्‍या सनी जगधनेकडे राग व्यक्त केला. कुलकर्णी यांना मारहाण करण्याचे बोलून दाखविले. जगधने तयार झाला. त्याने त्याच्या तीन पंटरांना सोबत घेतले. याचा पहिला प्रयत्न 20 सप्टेंबर रोजी झाला होता. कुलकर्णी विद्यालयात असताना सब्बन याने सांगितल्याप्रमाणे जगधनेचे पंटर कुलकर्णी यांना मारहाण करण्यासाठी आले होते; परंतू त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांनी शनिवारी दुपारी कुलकर्णी यांना रस्त्यात गाठून मारहाण केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या