Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रलॉकडाऊन नाही परंतु, राज्यात लागणार काही निर्बंध 

लॉकडाऊन नाही परंतु, राज्यात लागणार काही निर्बंध 

जालना – Jalana :

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असतानाच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सुरू झालेली असतानाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढे येत लवकरच राज्यात काहीअंशी निर्बंध लागणार असल्याचे संकेत दिले. 

- Advertisement -

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करत कोरोनाची सद्यस्थिती सांगितली व नागरिकांना सतर्क केले. कोरोना संसर्ग अजून गेलेली नाही.

धोका अद्याप टळलेला नाही. आपण एका नाजूक वळणावर आहोत. तिथून कोणत्या दिशेने जायचे आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे.

पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे नसेल तर आपल्याला नियम आणि शिस्त पाळावीच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले होते.

आपल्याला पुन्हा लॉकडाऊन नको आहे, असे स्पष्ट करत बेशिस्त वागणाऱ्यांना व विनामास्क फिरणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फैलावर घेतले होते. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका, स्वयंशिस्त पाळा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले होते.

सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे नमूद करत राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून बिनधास्तपणे वावरण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसत आहे.

ही स्थिती करोना वाढीस कारणीभूत ठरणारी असून त्यासाठीच निर्बंध लावले जाणार आहेत. लॉकडाऊन लावला जाणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार आहेत.

पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन त्यावर निर्णय होईल व त्याची घोषणा केली जाईल. याबाबत मुख्यमंत्रीही अनुकूल आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

मुंबईतील उपनगरीय लोकलबाबतही टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढत आहेत. ते पाहता लोकलसेवा सुरू करण्याचा तूर्त कोणताही विचार नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

दिवाळीत खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणीही गर्दी होत आहे.

विनाकारण आणि विनामास्क फिरणारे वाढले आहेत, या सर्वाचाच विचार करून निर्बंध घातले जाणार आहेत, असेही टोपे यांनी नमूद केले. लग्न व अन्य समारंभांसाठी २०० वरून पुन्हा एकदा ५० जणांचीच उपस्थिती बंधनकारक केली जाणार असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या